Published On : Thu, May 21st, 2020

जिल्हयात कोरोनाचे 20 नविन रुग्ण आढळले

Advertisement

गोंदिया : कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात झपाट्याने वाढतो आहे. बाहेर जिल्ह्यातून आणि राज्यातून रोजगारनिमित्त तसेच इतर कामानिमित्त गेलेले जिल्ह्यातील कामगार आणि नागरिक जिल्हयात मोठ्या संख्येने परत येत आहे.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची मोठी शक्यता आहे.

आज २० मे रोजी नविन २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 19 मे रोजी मुंबईतुन जिल्हयात दाखल झालेल्या दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे जिल्हयात आज २१ मे रोजी ऍक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या २२ इतकी झाली आहे.

यापुर्वी गडचिरोली जिल्हयात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या आणि गोंदिया जिल्हयात दाखल झालेल्या ६१ नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हयात १९ मे रोजी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई येथून त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांचा संपर्क तपासण्यात आले.

या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या सोबत प्रवास करणाऱ्या तसेच इतर एकुण ६१ नागरिकांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यापैकी २१ नागरिकांचे चाचणी अहवाल आज २१ मे रोजी सायंकाळी प्राप्त झाले. त्यापैकी २० पॉझिटिव्ह आणि १ नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

त्यामुळे या सर्व नागरिकांना कोरोना केयर सेंटर जिल्हा क्रीडा संकुल,गोंदिया येथे भर्ती करण्यात आले आहे. हे सर्व नागरिक अर्जुनी/मोरगाव आणि सडक/अर्जुनी तालुक्यातील आहेत. २१ मे रोजी ५० नमुने तपासणीसाठी नागपूर येथील पाठविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ४ विलगिकरण केंद्रातील कक्षात १७७ रुग्ण भरती आहे.तर चांदोरी-४,लईटोला-५ तिरोडा-१३,उपकेंद्र बिरसी-७,जलाराम लॉन गोंदिया-४,आदिवासी आश्रमशाळा,ईळदा-४३ आणि डवा येथील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळेत-७असे एकूण ८३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहण्याची वेळ आली आहे प्रत्येकाला आता कोरोना योद्धा म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.