Published On : Wed, Dec 12th, 2018

अधिक-यांच्या अटाहासामुळे गोंडेगाव शाळेच्या विद्यार्थ्याचे नुकसान

Advertisement

कन्हान : – गोंडेगाव प्रकल्पग्रस्त पालक व गावक-यांच्या समस्याचे निवारण करून गोंडेगावचे प्रथम योग्य पुर्नवसन नंतरच शाळा, गाव, कार्यालयाचे स्थलांतरण असे सर्व अधिका-यांच्या समक्ष ठरल्यावर सुध्दा अर्ध्या सत्रानंतर शाळा बंद असल्याने येथील शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान कोणाच्या आदेशाने सुरू आहे ? असा संतप्त सवाल सरपंच नितेश राउत सह गावक-यांनी शासनाकडे केला आहे .

वेकोलि किंवा महाराष्ट्र शासनाकडुन समस्याचे निवारण न करता व जि प शाळा पाल्यांच्या पालकांच्या समस्याचे निवारण न करता बळजबरीने वेकोलि शासनाच्या मदतीने गोंडेगावची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शनिवार (दि.१)डिसेंबर ला उपविभागीय अधिकारी जोगिंदर कटियार रामटेक यांच्या आदेशानुसार बोरडा रोड येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. प्रकल्पग्रस्तांच्या न्यायीक मागणी चा रोष पाहता अधिक-यांना परत जावे लागले .

यास्तव शुक्रवार (दि.७) ला प्रहार चे आमदार बच्चुभाऊ कडु व गोंडेगाव प्रकल्पग्रस्त यांनी नागपुर येथील वेकोलि डॉयरेक्टर पर्सनल संजीव कुमार यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे निवारणा करिता चर्चा करून बाजु माडली असता संजीव कुमार यांनी शाळा स्थलांतरित होणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रहार रामटेक विधानसभा प्रमुख रमेश कारामोरे, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, ग्रा प सदस्य सुभाष डोकरीमारे, आकाश कोडवते, रामदास वाघाडे, राजु पाटिल, प्रशात चौधरी, रविंद्र पहाडे, नितेश शेंदरे, दशरथ ठाकरे, संजय राशेगावकर प्रामुख्याने उपस्थित होते . परंतु सोमवार (दि.१०) ला वेकोलि सुरक्षा रक्षक, पोलीस बंदोबस्तासह गावात भ्रमण करित असताना गावक-यांनी त्यांना सांगितले की विद्यार्थी गावात शिकतील बाहेर कुठेही जाणार नाही . आपण बळजबरी केली तर उदभवणा-या प्रकारास स्वत: जवाबदार राहल असे शांततेने समाजावुन परत पाठविले.

गोंडेगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक १ते ८ ही शाळा बंद असुन शिक्षक शाळेत न आल्याने विद्यार्थ्यांना घरी परत जावे लागले . आज (दि.११) ला सुध्दा शाळा बंद असल्याने सरपंच व गावक-यांनी शाळेच्या बाहेर पटांगणात चटई टाकुन विद्यार्थ्यांना बसवुन खाजगी शिक्षका व्दारे विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले .

यामुळे गोंडेगाव प्रकल्पग्रस्तांच्या व पालकांच्या योग्य पुनर्वसनाच्या समस्या निवारण न करता कोणाच्या आदेशाने अर्घ्या सत्रानंतर जि प उच्च प्राथमिक शाळा बंद ठेवुन शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यात येत आहे ? असा संतप्त सवाल सरपंच नितेश राउत सह गावकयांनी शासनाकडे केला आहे . तसेच शिक्षकांना नियमित पणे पाठवुन गोंडेगाव शाळा सुरू ठेवण्यात यावी जेणे करून शासनाच्या धोरण नुसार कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहणार नाही .