नागपूर :आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने संविधान चौक,नागपूर येथे २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केले.
परंतु, या उपोषणाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. आमरण उपोषणावर असलेल्यांची प्रकृती खालावत चालली असून शासन दखल घेताना दिसून येत नाही. शासनाच्या या कृती विरोधात आदिवासी गोंडगोवारी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याविरोधात नागपूर येथे समाज बांधव आपले अधिकार व हक्कासाठी आज ५ फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चा काढला.
गोंडगोवारी समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष-
गोंडगोवारी समाजाच्या प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांकडे शासन सतत दुर्लक्ष करीत आहे. मागील कित्येक वर्षांपासून अधिकार व हक्कासाठी गोंड गोवारींचा लढा सुरू आहे. पण राज्यकर्ते संवैधानिक मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. या विरोधात आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती, महाराष्ट्रच्या नेतृत्वात संविधान चौक, नागपूर येथे २६ जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.
शासन मागण्यांना घेऊन गंभीर नसून फक्त आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपोषण मंडपात भेट देत नाही, तोपर्यत उपोषण सुरूच राहिल, असा इशारा देण्यात आला आहे. परंतु, दखल घेण्याऐवजी या उपोषणाकडे शासनाने दुर्लक्ष केले असून उपोषणावर असलेले किशोर चौधरी, सचिन चचाने व चंदन कोहरे यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे शासन गोंडगोवारीचा सुड घेत आहे, अशी भावना समाजात निर्माण झाली असून शासन कृती विरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे.