
नागपूर: मागील काही दिवसांपासून सुरू असलेली सोने आणि चांदीच्या किमतीतील घसरण आज (शुक्रवारी)ही कायम राहिली. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकाच दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्याने गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आहे.
एक दिवस आणि आठवड्याचा आकडा-
ताज्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सोन्याचा दर तब्बल ₹1,820 प्रति 10 ग्रॅमने घसरला असून, चांदीची किंमत ₹4,400 प्रति किलोने कमी झाली आहे. गेल्या सात दिवसांचा विचार करता ही घट आणखी चिंताजनक आहे.
सोनं: आठवडाभरात सोन्याच्या दरात तब्बल ₹9,300 पर्यंत घसरण झाली आहे.
चांदी: चांदीच्या किमतींमध्ये गेल्या सात दिवसांत जवळपास ₹31,000 प्रति किलोची मोठी घट नोंदवली गेली आहे.
विशेषज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक चढउतार आणि गुंतवणूकदारांनी नफावसुलीचा मार्ग स्वीकारल्याने या मौल्यवान धातूंमध्ये ही मोठी घसरण दिसून आली आहे. मात्र, या दरकपातीनंतर दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात खरेदीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








