Published On : Sat, May 12th, 2018

शेतकर्‍यांना दिवसा वीज देणार : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

bhandara mohdura sabha1
भंडारा/मोहदुरा: भंडारा जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांसाठ़ी आणण्यासोबतच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिवसा वीज देणार आहोत. पिकाला पाणी देण्यासाठी रात्री शेतकर्‍यांना शेतात जाण्याची गरज राहणार नाही, असे अभिवचन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत शुक्रवारी रात्री मोहदुरा येथे पालकमंत्री बोलत होते. आ. रामचंद्र अवसरे, सरपंच रामेश्वर लिचडे, नितीन कढव व अन्य यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले- काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारचे दिवस आठवा. गावांमध्ये 4 ते 6 तास भारनियमन होते. आता गावे भारनियमनमुक्त झाली आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत भंडार्‍यावर 100 कोटी रुपये खर्च करणार. गावात आता 24 तास वीज सुरु राहणार आहे.

भंडारा जिल्ह्याला आधी जिल्हा नियोजनमधून फक्त 80 कोटी मिळत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जिल्हा नियोजन समिती आता 140 कोटींवर आपण नेऊ शकलो आहे. हजारो शेतकर्‍यांची शेती वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये झाली. शेतकरी मालक झाला. 47 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी केली. ज्यांची कर्जमाफी झाली नाही, त्यांचीही होणार आहे. यंदाच्या खरीप पीक नियोजनात भंडारा जिल्ह्यातील शेतकर्‍याला 700 कोटींचे कर्ज मिळणार आहे. ही निवडणूक 8 महिन्यांसाठी असली तरी कमळाच्या चिन्हाचे बटन दाबून हेमंत पटले यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

bhandara mohdura sabha2
अस्तित्वाची लढाई : आ. अवसरे
भाजपाचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वासघात करणार्‍याला धडा शिकविण्यासाठ़ी ही अस्तित्वाची लढाई असल्याचे आ. रामचंद्र अवसरे यांनी यावेळी म्हटले. अन्य पक्षातून आलेल्या उंच माणसाला सावली मिळेल म्हणून आपण निवडून दिले होते. पण सावली मिळालीच नाही, विश्वासघात झाला. या निवडणुकीतून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळेच ही निवडणूक देशात राजकीय रंग भरणारी ठरणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून खासदाराने आपले कर्तव्य पार पाडले नाही, अशा व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी हेमंत पटले यांच्या कमळाचे बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन आ. अवसरे यांनी केले.
मोहतुरासारख्या लहानशा गावातही गावातील नागरिक आणि महिलांनी या सभेला चांगलीच गर्दी केली होती.