Published On : Mon, May 21st, 2018

पर्यटन स्थळांच्या विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य द्या – चंद्रशेखर बावनकुळे

  • दीक्षाभूमी, ड्रगन पॅलेस येथील कामे 15 ऑगस्ट पूर्वी सुरु करा; मालकी हक्क व 10 टक्के निधीची अट शिथीलतेसाठी प्रस्ताव
  • रामटेक, नगरधन पर्यटकांसाठी सुविधा, चिंचोली येथील स्मारक डिसेंबरपर्यंत पूर्ण; कोराडी, आदासा, ताजबाग आढावा

Chandrashekhar Bawankule

नागपूर: पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत आराखडयानुसार शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. दीक्षाभूमी, ड्रगन पॅलेस, रामटेक, तसेच नगरधन येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा संदर्भातील सविस्तर आराखडा तयार करुन 15 ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात बचतभवन सभागृहात पर्यटन विकासासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी राज्यमंत्री सुश्री सुलेखाताई कुंभारे, नितीन राऊत, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, दीक्षाभूमी संस्थेचे विलास गजघाटे, चरणसिंग ठाकूर तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाने शंभर कोटी रुपये तर ड्रगन पॅलेस परिसरात पर्यटन विकासासाठी 25 कोटी रुपयाचा निधी तात्काळ उपलब्ध करुन दिला आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देताना विकास कामांच्या संदर्भात संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्रगन पॅलेस तसेच दीक्षाभूमी या संस्थेकडून मालकी हक्काबाबतची तसेच 10 टक्के निधी बाबतची अट शासनाने शिथील करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. या संदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात.

दीक्षाभूमी व ड्रगन पॅलेस येथील विकास कामे 15 ऑगस्ट पूर्वी सुरु करण्याचे नियोजन, नागलोक आणि बृध्दभूमीसाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये, कुवारा भिवसेन येथे पर्यटन स्थळ विकासासाठी आदीवासी विकास विभागातर्फे 15 कोटी रुपये, तसेच दीक्षाभूमी येथील मंजूर झाल्या व्यतिरिक्त उर्वरित कामासाठी 200 कोटी रुपये, ड्रगन पॅलेससाठी 200 कोटी रुपये आणि महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थांन कोराडीसाठी अतिरिक्त 65 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.

स्वदेश दर्शन अंतर्गत वाकी पर्यटन स्थळासाठी 5 कोटी 86 लक्ष, धापेवाडा 8 कोटी 58 लक्ष, पारडसिंगा 8 कोटी 72 लक्ष, छोटा ताजबाग 5 कोटी 54 लक्ष, तसेच तेलंगखेडी येथे पर्यटकांसाठी आवश्यक सुविधाअंतर्गत 3 कोटी 29 लक्ष रुपयाअंतर्गत घ्यावयाच्या कामाबाबतचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या कामांचे सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे सूचना देण्यात आल्या.

शांतीवन, चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूचे संरक्षण व संवर्धन तसेच म्यूझियम तयार करण्यासाठी 40 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त 17 कोटी 50 लक्ष रुपयाचा निधी सुध्दा आवश्यकतेनुसार मंजूर करण्यात येत असून ही संपूर्ण कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. ताजबाग येथील विकासासाठी 132 कोटी 49 लक्ष रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास कामांचा प्रगतीनुसार आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून आतापर्यंत 61 कोटी 39 लक्ष रुपये खर्च झाला आहे. जिल्हयातील पर्यटन विकासाअंतर्गत मंजूर झालेले सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

प्रारंभी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वागत करुन पर्यटन विकासाअंतर्गत तसेच दीक्षाभूमी, ड्रगन पॅलेस, महालक्ष्मी मंदीर कोराडी आदी मंजूर आराखडयानुसार कामांच्या प्रगतीची माहिती यावेळी दिली. जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके यांनी विभागनिहाय उपलब्ध निधी यासंदर्भात बैठकीत माहिती दिली.