ठाणे :राजकारणात टायमिंगचे महत्त्व अधोरेखित करत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला ठाण्यात मोठा धक्का दिला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी यांनी आज मुंबईत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, महिला राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या ठाणे शहराध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, हा कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या जनसंपर्क विभागाकडून ठरवलेल्या 10.10 वाजताच वेळेत पार पडला. नेहमी पक्षप्रवेश कार्यक्रम उशिराने होण्याचा अनुभव असतो, मात्र शिंदे यांच्या टायमिंगमध्ये हा कार्यक्रम वेळेवर पार पडल्याने माध्यमांमध्ये याची विशेष चर्चा रंगली आहे.
या पक्षप्रवेशामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पकडीत खिळखिळेपणा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत या घडामोडीचा मोठा राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करत असून, यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी आव्हान अधिक तीव्र होणार आहे.