Published On : Thu, Jan 10th, 2019

जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलिओ लस द्या-अश्विन मुदगल

नागपूर : येत्या 3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलिओ लस द्या. जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद गणवीर यावेळी उपस्थित होते.

पोलिओच्या प्रादुर्भावामुळे बालकांना कायमचे अपंगत्व येते. त्यामुळे ते टाळण्यासाठी देशपातळीवर याची मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही करण्यात येते. पोलिओच्या समूळ उच्चटनासाठी देशपातळीवर 1995 पासून संपूर्ण देशात पल्स पोलिओ लसीकरण ही मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात 2010 मध्ये पाच पोलिओग्रस्त बालके आढळून आली होती. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत एकही बालक आढळून आलेले नाही. मात्र असे असतानाही जिल्ह्यात 1594 गावे आणि 10 शहरांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असून, त्यासाठी 5 वर्षाखालील 2 लाख 13 हजार 575 बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.

त्यासाठी 2528 लसीकरण केंद्र राहणार असून, ट्रान्झीट आणि मोबाईल टीम दोन्ही मिळून एकूण 570 दिवस काम करणार आहेत. त्यासाठी या सर्व टीम महामार्ग, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या वस्त्या, घरे, धाबे, शेतातील मजूरांची बालके, भटक्या लोकांची मुले, इमारत बांधकामावरील मजुरांची बालके, शिवाय बाजाराच्या दिवशी येणाऱ्या बालकांनाही ही लस देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

गावात ग्रामसभ, दवंडी,सर्व बसस्थानके, रेल्वेस्थानके, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावात प्रभातफेरी काढूनही जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच तालुक्यासाठी एक जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून, जिल्ह्यात तीन लाख 20 हजार पोलिओ डोसची मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण झाली असलयाचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी सांगितले.