मुंबई : ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या ‘महाज्योती’ संस्थेला अधिक निधी मिळावा, अशी ठोस मागणी भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत केली.
डॉ. फुके म्हणाले की, अनुसूचित जाती व जमातींसाठी ‘बार्टी’, मराठा समाजासाठी ‘सारथी’, आदिवासी बांधवांसाठी ‘टीआरटीआय’ तर ओबीसींसाठी ‘महाज्योती’ ही संस्था कार्यरत आहे. या सर्व संस्थांना शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला असला, तरी ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी असल्याने महाज्योतीसाठी अतिरिक्त निधीची नितांत गरज आहे.
ओबीसी समाजाचा देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. मात्र, त्यांच्या संख्येच्या तुलनेत संसाधने अपुरी आहेत. शिक्षण, मार्गदर्शन, प्रशिक्षण आदी उपक्रम प्रभावीपणे राबवायचे असतील, तर अधिक निधीची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. त्यांच्या या मागणीला विरोधी पक्षातील काही सदस्यांनीही पाठिंबा दिला असून शासन या मागणीचा गांभीर्याने विचार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.