Published On : Fri, Nov 29th, 2019

हायटेन्शन लाईनच्या प्रभावाने बेघर झालेल्यांना १५ दिवसात नवीन घर द्या!

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे कारवाई

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हायटेन्शन लाईनच्या प्रभावक्षेत्रातील रहिवासी निवासस्थाने तोडण्याचे कार्य महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या कारवाईद्वारे बेघर झालेल्या नागरिकांना १५ दिवसात सरकारी योजनेच्या माध्यमातून नवीन घर द्या, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत मनपाद्वारे गिरी कॉलनी, जाटतरोडी क्षेत्रातील घरे तोडण्यात आली. शुक्रवारी (ता.२९) महापौर संदीप जोशी यांनी गिरी कॉलनी येथे भेट देउन पिडीतांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक विजय चुटेले यांनी नागरिकांच्या समस्यांशी अवगत केले. न्यायालयाच्या आदेशामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. त्यांच्या डोक्यावरील छत गेल्याने कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या नागरिकांना मनपातर्फे मदत करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी नगरसेवक चुटेले यांनी केली.

मनपा व राज्य शासनाच्या निधीतून बीएसयूपी योजनेंतर्गत झिंगाबाई टाकळी येथे सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांमध्ये किचन, बेडरूम, हॉल यासह प्रसाधगृह, विद्युत, पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या ठिकाणी पिडीतांना घरे देण्यात येतील, असे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले. पिडीतांना घर उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे उपस्थित होते.