Published On : Tue, Oct 3rd, 2017

अंगणवाडी सेविकांना किमान १० हजार मानधन द्या!

Advertisement

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासंदर्भात चर्चा केली. अंगणवाडी सेविकांना किमान १० हजार रूपये मानधन देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, सध्याची महागाई व वाढलेले काम पाहता अंगणवाडी सेविकांना किमान १० हजार रूपयांचे मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. देशातील केरळ, तेलंगणा, पाँडेचेरी सारख्या राज्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना १० हजारांहून अधिक मानधन दिले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने अंगणवाडी सेविकांना फक्त ६.५ हजार रूपये मानधन देण्याचा प्रस्ताव ठेवावा, हे अयोग्य आहे.

सप्टेंबर २०१७ मध्ये अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सुमारे ३ आठवड्यांच्या आंदोलनातील मागण्या अत्यंत रास्त आहेत. अंगणवाडी सेविकांचे हे आंदोलन केवळ आपल्या मानधन वाढीसाठी नव्हे तर बालके व गरोदर महिलांच्या देखभालीसाठी असलेल्या शासकीय योजनांची परिणामकारकता वाढविण्यासाठी देखील आहे.

बालकांच्या पोषण आहारासाठी असलेल्या प्रत्येकी ४.९२ रूपयांच्या तुटपुंज्या रक्कमेत योग्य वाढ करावी, जेणेकरून कुपोषणाशी लढता येईल, अशी व्यापक हिताची मागणीही अंगणवाडी सेविका मांडत आहेत. कुपोषण व बालमृत्यू रोखण्याच्या मोहिमेत महत्वाची भूमिका वठविणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना न्याय देणे व्यापक लोकहिताच्या अनुषंगाने अत्यंत आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.