गिरीशभाऊंनी जीवनात केलेल्या कामाची प्रेरणा नवीन पिढीला मिळावी : ना. गडकरी
नागपूर: गिरीशभाऊंनी पर्यावरण, साहित्य, संस्कृती, कला, नाटक, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी आपल्या जीवनात जे काम केले त्याची प्रेरणा नवीन पिढीला मिळावी, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
गिरीश गांधी अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अरुण गुजराथी, न्या. सिरपूरकर, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, खा. कृपाल तुमाने, अजय संचेती, माजी मंत्री रमेश बंग, मधुकर भावे, अतुल कोटेचा, बबनराव तायवाडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- गिरीशभाऊंचा कार्याचा गौरव करणारा गौरव ग्रंथही आम्ही प्रकाशित करणार आहोत. पण आज ग्रंथ कुणी वाचत नाही. यासाठी एक फिल्मही तयार केली आहे. गौरव ग्रंथही प्रकाशित करणार आहोच. कारण गिरीशभाऊंनी केलेल्या कार्यापासून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण की सत्ताकारण हे समजून घेतले पाहिजे. वास्तविक राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे एक माध्यम आहे. शिक्षण क्षेत्र, कलाक्षेत्र, साहित्य, संस्कृती, नाट्य अशा सर्वच क्षेत्रात चांगले काम झाले पाहिजे. गिरीशभाऊंचे कार्य पाहिले म्हणजे मोहन धारिया यांची आठवण होते. मोहन धारिया आणि गिरीशभाऊंचे अत्यंत जवळचे संबंध होते, असेही ना. गडकरी म्हणाले.
सामाजिक जीवनात काम करताना आपले सामाजिक जीवन समृध्द, संपन्न व्हावे, त्यात गुणात्मक बदल व्हावे यासाठी व्यक्ती आणि नेतृत्वात गुणात्मक परिवर्तन झाले पाहिजे. गुणात्मक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. गिरीशभाऊ या विचाराने जीवन जगले. अनेक चांगल्या गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजे. मनुष्य किती जीवन जगला यापेक्षा तो कसा जीवन जगला याला अधिक महत्त्व आहे. किती प्रामाणिक, किती सचोटीचा, किती साधा, किती सरळ, किती नम्र व किती कर्मठ असावा याची गिरीशभाऊ उदाहरण असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.