Published On : Fri, May 31st, 2019

गंजीपेठेत औषधबाजाराला भीषण आग पालकमंत्र्यांनी दिली घटनास्थळाला भेट

नागपूर: गंजीपेठेतील ठोक औषध बाजाराच्या इमारतीला गुरुवारी मध्यरात्री शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगाीत कोणतीही जीवित हानी झाली नसून लाखो रुपयांच्या औषधी असलेली दुकाने भस्मसात झाली. या इमारतीत असलेल्या 400 दुकानांपैकी 200 पेक्षा जास्त दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आज सायंकाळपर्यंत मनपाच्या अग्निशमन विभागाची चमू आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगीच्या घटनास्थळाला भेट देऊन आगीचे कारण जाणून घेतले. या संदर्भात लवकरच योग्य तो कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पालकमंत्री बावनकुळे यांच्यासोबत घटनास्थळावर याप्रसंगी आ. सुधाकर कोहळे, नगरसेवक दयाशंकर तिवारी उपस्थित होते. औषध बाजाराची ही चार मजली इमारत असून हज हाऊसच्या विरुध्द बाजूला आहे. मध्यरात्री या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका दुकानाला लाग लागली. आग लागल्याची सूचना अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाची चमू येईपर्यंत आगी पसली आणि आगीने पहिला मजला पूर्ण व्यापला.

आज पहाटेपासून अग्निशमन विभागाची चमू आग विझविण्याचे काम करीत होती. पाहता पाहता आग दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यापर्यंत पसली. सायंकाळपर्यंत पूर्णपणे आग विझविण्यात यश आले नव्हते. सायंकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या सुमारे 50 गाड्या पाणी आग विझविण्यासाठ़ी लागल्याची माहिती आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शुक्रवार तलावातील पाणी पंप लावून वापरण्यास घेतले.

आग लागली तेव्हा सर्व दुकानांचे शटर बंद होते. अग्निशमन दलाची चमू येईपर्यंत दुकानातील आताील भाग पूर्णपणे जळला होता. त्यामुळे दुकानांचे शटर तोडून आग विझविण्याचे काम करावे लागत होते. आगीच्या ज्वाला कुठेही दिसत नव्हत्या मात्र प्रचंड धूर निघताना दिसत होता. त्यामुळे बघ्यांची घटनास्थळावर चांगलीच गर्दी झाली होती.