
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना अॅटो रिक्षामध्ये बसवून त्यांच्या बॅगमधील सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या टोळीला गणेश पेठ पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यातील ११ लाख ४५ हजार रुपयांचा चोरीचा माल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना गाठून विश्वास संपादन करत अॅटोमध्ये बसवणे आणि प्रवासादरम्यान संधी साधून बॅगमधील मौल्यवान वस्तू लंपास करणे, असा या टोळीचा प्रकार होता. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गणेश पेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून या टोळीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे —
इमरान उर्फ सोनू इजाज खान (वय ४१), रा. लोधीपुरा, जुना जेलखाना जवळ, गणेश पेठ; सध्या रा. बजरंग नगर, गल्ली नं. ९, अजनी शहादद खान हबीब खान (वय २८), रा. गौसिया कॉलनी, दिघोरी, पो.ठा. हुडकेश्वर, नागपूर अब्दुल नदिम वल्द नईम शेख (वय २८), रा. बारा खेली, दिघोरी चौक, पठाण पेट्रोल पंपाजवळ आसिम अहमद जमीर अहमद (वय ४२), रा. मकसूद तनपुर हफीज, ता. जि. बिजनौर रविंद्र कुमार उर्फ दालू भुरे सिंग (वय ५०), रा. मकसूद तनपुर हफीज, ता. जि. बिजनौर आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरी केल्याचा संशय असून, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींच्या अॅटोमध्ये बसताना दक्षता घ्यावी, असे आवाहन गणेश पेठ पोलिसांनी केले आहे.








