Published On : Fri, Oct 9th, 2020

गांधी जयंती सप्ताहाचा समारोप 151 सायकल स्वारांच्या सायकल यात्रेने

वर्धा : महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त सुरु असलेल्या सप्ताहाचा समारोप 10 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता सेवाग्राम आश्रम येथे 151 सायकल स्वारांच्या सायकल यात्रेने होणार आहे. या यात्रेत जिल्हाभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आपले कुंटूंब आपली जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती आरोग्य तपासणी व आरोग्य संदेशाद्वारे करण्यात येणार आहे. या समारोपीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधीनींचाही सहभाग राहणार आहे. रॅली दरम्यान वैद्यकिय पथक नागरिकांची तपासणी सुध्दा करणार आहे. तपासणी मध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

जिल्हयातील 10 नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात 151 सायकल स्वारांची सायकल रॅली तसेच चित्ररथाव्दारे शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून ‘आपले कुंटूंब आपली जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करणार आहे.यादरम्यान रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, आशा,अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्राम विकास विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी होऊन नागरिकांना प्रत्यक्ष कोरोना विषाणू आजाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देतील. तसेच चित्ररथाव्दारे ऑडिओ संदेशाच्या स्वरुपात मार्गदर्शनासोबत वैद्यकिय अधिकारी नागरिकांची तपासणी करणार आहेत. तपासणी दरम्यान नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, अस्थमा, मधुमेह, किडनी यासारखे आजार असल्याची तपासणी करुन पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करतील.

सायकल रॅलीमध्ये सहभागी व्यक्ती माझे कुंटूंब माझी जबाबदारी असलेले टी शर्ट व टोपी परिधान करुन नगर पालिका, नगर पंचायत व शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत परिसरात जनजागृती करणार आहे.


आपत्ती व्यवस्थापन कायदयाचे पालन व्हावे यासाठी रॅलीमध्ये उपस्थितांचा विचार करुन शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने वर्धा शहरासाठी चार पथक तयार करण्यात आले असून पथक क्रमांक एक सेवाग्राम आश्रम येथून निघणार असून रॅलीचा प्रारंभ मान्यवराचे हस्ते होणार आहे. दुस-या व तिस-या पथकातील रॅलीचा प्रारंभ बजाज चौक व चौथ्या पथकातील रॅलीचा प्रारंभ महात्मा गांधी चौक येथून करण्यात येणार आहे. रॅली वेगवेगळया मार्गाने मार्गक्रमण करुन ‘माझे कुंटूंब माझी जबाबदारी’ तसेच महात्मा गांधीचा संदेश आणि महात्मा गांधींच्या विचारांबाबत जनजागृती करणार आहेत.