Published On : Tue, Feb 4th, 2020

महात्मा गांधी म्हणजे सत्कार्याचा प्रेरणास्रोत : प्रा. तुंडुरवार

गांधी विचारांवरील निबंध स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव सोहळा

नागपूर: मानवता, वैश्विकता, संवेदनशीलता, मैत्री, परोपकार, कर्तव्य, प्रेम, शांती, धैर्य या सर्वांचे एक नाव म्हणजे महात्मा गांधी. यापैकी एक गुण अंगीकारला तरी ती व्यक्ती गांधी विचारांची पाईक ठरते, असे प्रतिपादन प्रा. संदीप तुंडुरवार यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त स्वयम् सामाजिक संस्था, माय करिअर क्लब आणि जागतिक अहिंसा दिन आयोजन समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या विजेत्यांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात रविवारी (ता. २) आयोजित या कार्यक्रमाला स्वयमचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रा. राजेश रहाटे, गजराज हटेवार, सुभाष भोयर उपस्थित होते.

प्रा. तुंडुरवार म्हणाले, कितीही संकटे आली तरी सत्य हे कायम राहते. हाच सत्याचा मार्ग महात्मा गांधी यांनी अखिल मानवजातीला दाखविला. गांधी म्हणजे नीतिमूल्यांचे संस्कार आणि सत्कार्याचा अविरत प्रेरणास्रोत. जीवनात त्यांनी प्रत्येकाकडे स्नेहभावनेने बघितले. कुणालाच शत्रू मानले नाही. देशवासीयांना आपल्या हक्काप्रती जागरूक करून कर्तव्यासाठी तत्पर केले. केवळ प्रांत, देशापुरता विचार न करता मानवकल्याणाची तळमळ असल्याने गांधी हे वैश्विक नेते ठरले. म्हणूनच विश्वाच्या अंतिम क्षणापर्यंत गांधी विचार कायम राहील, असा विश्वास तुंडुरवार यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकातून विशाल मुत्तेमवार यांनी निबंध लेखन स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. आजच्या तांत्रिक आणि यांत्रिक युगात आत्मचिंतनाची सवय कमी झाल्याचे ते म्हणाले. ज्या पिढीला संस्कार आणि इतिहासाचा विसर पडतो त्यांचे भविष्य धोक्यात येते. अशा वेळी सर्वधर्मसमभाव जोपासून देशाला एकसंघ करणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार भावी पिढीमध्ये रुजविण्याची गरज मुत्तेमवार यांनी व्यक्त केली.

निबंध लेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून विचारक्षमतेसह लेखनकौशल्य विकसित करण्याचे त्यांनी आवाहन केले. या निबंध लेखन स्पर्धेत शहरातील ४३ शाळा-महाविद्यालयांतील सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले, तर प्रत्येक शाळेतील तीन विद्यार्थ्यांना सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची संधी मिळणार आहे. संचालन खुशी निघडे व जीवन आंबुडारे यांनी केले. अमोल ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी किशोर वाघमारे, प्रकाश भोयर, मोहन गवळी, राहुल खळतकर, कपिल आंबुडारे, अमोल नेहारे यांनी सहकार्य केले.