Published On : Sat, Dec 7th, 2019

कांद्यांची साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – रविंद्र ठाकरे

Advertisement

नागपूर : किरकोळ बाजारात दररोज कांद्याच्या किमतीत वाढ होत आहे. ही दर वाढ करतांना कांदा व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक साठेबाजी होत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यापारांच्या गोदामांची तपासणी करावी. तसे आढळल्यास त्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले.

दररोज वाढत असलेल्या कांद्याच्या किमतीबद्दल जिल्हाअधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पुरवठा विभाग सोबत आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी 100 गोदामामध्ये तपासणी करण्याचे निर्देश दिले. प्रमाणापेक्षा जास्त कांद्याचा साठा आढळून आल्यास कडक कारवाईचे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिले.

यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी ए.के. सवाई, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, कळमना मार्केटचे प्रेसिडेंट प्रशांत मेरकर, विदर्भ ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शामकांत पार्थीकर, शेतकरी प्रतिनिधी संदीप माटे, पुरवठा निरीक्षक विवेक शिरेकर आदी उपस्थित होते.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे, या अवेळी पावसामुळे नवीन कांदे शेतकऱ्यांना बाजारात आणावे लागतात. या कांद्याचा साठा करणे कठीण आहे. व्यापाऱ्यांना कांदा वाळवून विकावा लागतो आहे. त्यामुळे जे व्यापारी कांद्याचा प्रमाणापेक्षा जास्त कांद्यांचा साठा करून नंतर दर वाढवण्याची प्रतीक्षा करत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यापाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले