शहीद सप्ताहाबाबत मजकूर : कमलापूर, झिंगानूर परिसरात आढळले बैनर्स
गडचिरोली। पीपल्स लिब्रेशन गुरील्ला आर्मी या माओवाद्यांच्या संघटनेचा शहीद सप्ताह 28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत दरवर्षी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी देखील माओवाद्यांनी हा सप्ताह पाळण्याचे आवाहन केले आहे. यासाठी अहेरी व सिरोंचा तालुक्यात ठिकठिकाणी माओवाद्यांनी पत्रकबाजी केली आहे.
सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर गावातील चौकमध्ये 23 जुलैच्या सकाळी नक्षली बैनर व पत्रके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकामध्ये 28 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात शहीद सप्ताह साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या काळात लाल झेंडे उभारुन शहीदांचे स्वप्न साकार करण्यासाठी निरंतर संघर्ष करा, असा आवाहन माओवादी संघटनेने केले आहे. या फलकवार भाकपा माओवादी सिरोंचा एरिया कमिटी असा उल्लेख करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागात सप्ताहनिमित्त माओवाद्यांमार्फत बैनर व पत्रके लावले जात आहे. चामोर्शी तालुक्यात रेगडी भागातही बुधवारी माओवाद्यांचे बैनर रस्त्यावर लावलेले दिसून आले. पोलिसांनीही माओवाद्यांचा शहीद सप्ताह साजरा होत असल्यामुळे प्रतिउत्तरदाखल शांतियात्रांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरवर्षीच पोलिस प्रशासन अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. अहेरी तालुक्यातील कमलापूर भागातही बैनर्स आढळून आले आहे.
