Published On : Thu, Aug 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गडचिरोलीच्या आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, मुख्याध्यापक-अधीक्षक अटकेत

माजी खासदारांसह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
Advertisement

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित निवासी आश्रमशाळेत विषारी सापाने सहा विद्यार्थिनींना दंश केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन जणींवर उपचार सुरू आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर भोयर यांना अटक केली आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कोवासे आणि महिला वसतिगृह अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्यासह पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री झोपेत असताना सर्पदंश-

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१० ऑगस्टच्या मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनी आपल्या खोलीत झोपल्या होत्या. त्याचवेळी विषारी सापाने सहा विद्यार्थिनींना दंश केला. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडल्याने आश्रमशाळेत एकच खळबळ उडाली. सर्वांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान सहावीतील दीपिका लकडा, आठवीतील सुष्मिता मंडल आणि दुसरीतील अनु कोरेटी यांचा मृत्यू झाला. दीपिका मडावी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून समृद्धीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

आश्रमशाळेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न-

तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थिनींची रात्रीची देखरेख, परिसराची स्वच्छता, विषारी प्राण्यांपासून बचावाच्या उपाययोजना आणि प्रशासनाची जबाबदारी याबाबत पालक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या तक्रारीवरून तसेच चार सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. प्राथमिक तपासात प्रशासनिक पातळीवर निष्काळजीपणाचे संकेत मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

माजी खासदारांसह पाच जण आरोपी-

या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, वसतिगृह अधीक्षक भास्कर भोयर आणि महिला वसतिगृह अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षकांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.

आदिवासी विकास मंत्र्यांकडून पाहणी-

घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी १२ ऑगस्ट रोजी जपतलाई आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी विद्यार्थी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.

तीन विद्यार्थिनींचा मृत्यू अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकशीच्या पुढील टप्प्यात आणखी कारवाईची शक्यता-

सध्या पोलिसांकडून आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थिनींची देखरेख आणि प्रशासनाची जबाबदारी याची सखोल चौकशी सुरू आहे. तपासात आणखी कोणाची निष्काळजीपणा किंवा जबाबदारी समोर आल्यास संबंधितांवरही कायदेशीर आणि विभागीय कारवाई होण्याची शक्यता आहे.

तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.