Published On : Fri, Jun 2nd, 2017

दिलेले काम आव्हान म्हणुन स्विकारीत आनंदाने पुर्ण करा – भालचंद्र खंडाईत

Advertisement

Bhalchandra Khandait
नागपूर:
महावितरणमध्ये आपण काम करीत असतांना आपल्याला देण्यात आलेल्या कामांना आव्हान म्हणून स्विकारीत ती कामे करतांनाचा आनंद घ्या किंवा दबावाखाली येत ते काम करा, असे दोन पर्याय आपणापुढे असतात त्यापैकी आपणास कोणताही एकच पर्याय निवडायचा असतो त्यापैकी पहिला पर्याय ख-या अर्थाने आपल्या व कंपनीच्या हितावह असल्याचे मनोगत महावितरणच्या नागपूर प्रविभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी व्यक्त केले.

भालचंद्र खंडाईत यांनी नुकताच प्रादेशीक संचालकाचा पदभार स्विकारला असून शुक्रवारी त्यांनी नागपुर प्रविभागातील नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अमरावती आणि अकोला या पाचही परिमंडलांच्या कामकाजाचा नागपूर येथे आयोजित एका संयुक्त बैठकीत आढावा घेतला. यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख, चंद्रपूरचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, गोंदीयाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी आणि अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांचेसह पाचही परिमंडलातील अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

वीज ग्राहक आणि महाविवतरण अधिका-यांमध्ये संवादाचा अभाव असल्याने अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे योग्य समन्वय ठेवण्याचे आवाहन करतांनाच ग्राहकाला समाधानकारक सेवा देतांनाच त्याने वापरलेल्या प्रत्येक युनिट विजेचे बिलही वसुल व्हावे, थकबाकीदार ग्राहकांकडील बिल बरुन घ्या, जास्तीत जास्त संख्येने ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा, यासाठी वीजबिल भरणा केंद्रांना विशेष सुचना करण्याचे आवाहनही खंडाईत यांनी केले.

जास्त वीजहानी असणाऱ्या उपविभाग – विभागांनी योग्य त्या उपाययोजना करून वीज हानी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर मान्सून लवकरच महाराष्ट्रात पोहचणार असल्याने देखभाल दुरूस्तीची कामे वेळेत पुर्ण करावीत व पावसाळयातही आपल्या ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देतांनाच त्यांनि गैरकृषी वीज वापर वाढविण्याच्या सुचनाही सर्व उपस्थितांना केल्या. मीटर रिडींग घेण्यात आणि कॅशटॅली करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली.