Published On : Tue, Nov 2nd, 2021

सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी मतदानाचे कर्तव्य निभवा – जिल्हाधिकारी आर. विमला

Advertisement

ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी ‘एनव्हीएसपी’ संकेतस्थळ व ‘वोटर हेल्पलाईन ॲप’
मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

नागपूर : भारत निवडणूक आयोगाकडून 1 जानेवारी, 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक व युवतींनी मतदार म्हणून मतदार यादीत नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत छायाचित्रासह मतदार नोंदणी, मतदारयाद्यांचे शुध्दीकरण आणि सुसूत्रीकरण, दावे व हरकती स्वीकारणे, सुधारित अंतिम यादी प्रसिध्द करणे ही कामे 30 नोव्हेंबरपर्यंत केल्या जाणार आहेत. त्यानुसार 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येकाने मतदार यादीत आपली नोंदणी करुन निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे. सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य निभवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे केले.

हिंगणातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी येथे आज जिल्हाधिकारी श्रीमती विमला यांच्या उपस्थितीत कामगारांसाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनल कळसकर, तहसीलदार संतोष खंडारे, नायब तहसीलदार ज्योती भोसले, कंपनीचे प्रशासकीय अधिकारी विजयकुमार चंद्रा, मानवसंसाधन प्रमुख श्री. कळंबे यांच्यासह कामगार यावेळी शिबिरात उपस्थित होते.

श्रीमती विमला म्हणाल्या की, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी, एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे, दावे व हरकती स्विकारणे, विशेष मोहिम राबविणे, दावे व हरकती निकालात काढणे तसेच मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी आदी कामे निवडणूक विभागाव्दारे करण्यात येणार आहे. नागरिकांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदान नोंदणी, ठिकाणात बदल, मतदान कार्डातील चुका दुरुस्ती तसेच मतदार यादीत छायाचित्र नसणे आदी कामे मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून करुन घ्यावी. मतदार यादीत ऑनलाईन नाव नोंदण्यासाठी आयोगाव्दारे ‘एनव्हीएसपी’ संकेतस्थळ व ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ विकसित करण्यात आले. हे ॲप सोपे असून नागरिकांनी ॲप डाऊनलोड करुन त्या माध्यमातून मतदान कार्ड संदर्भातील आवश्यक बाबी पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

मतदानाविषयी जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजाविता यावा तसेच अगदी सहजरित्या मतदार नोंदणी करता यावी यासाठी निवडणूक आयोगाव्दारे ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ विकसित करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मतदार नोंदणी व अनुषंगिक कामे करता येईल तसेच 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांना सुध्दा मतदार नोंदणी करता येईल. निवडणूक विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या अर्ज क्र. 6, 6-अ, 7, 8 व 8-अ च्या अर्जाव्दारे नागरिकांना मतदान नोंदणी संबंधिचे कामे पूर्ण करता येईल. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर हजर राहून पात्र व्यक्तींचे मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारतील. नागरिकांनी आवश्यक नमुन्यात अर्ज दाखल करून नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादी संदर्भात इतर कामे करून घ्यावीत. निवडणूक आयोगाच्या ‘एनव्हीएसपी’ संकेतस्थळ आणि ‘मतदार सहायता ॲप’च्या माध्यमातूनही मतदारांना यादीत नाव नोंदविता येईल. हे ॲप अँड्रॉईड व आयओएस या दोन्हीवर उपलब्ध आहे, अशी माहिती श्रीमती कळसकर यांनी यावेळी दिली.

असा आहे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

-एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे- दि. 1 नोव्हेंबर
-मतदार नोंदणी, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी – दि. 1 ते 30 नोव्हेंबर
-दावे व हरकती निकालात काढणे – दि. 1 ते 20 डिसेंबरपर्यंत
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी – दि. 5 जानेवारी, 2022

विविध अर्जांची माहिती :

* प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांसाठी/एका मतदारसंघातून इतर मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी – अर्ज क्र. 6

* अनिवासी मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी- अर्ज क्र.6- अ

* इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत आक्षेप घेण्यासाठी/ स्वत:चे नाव वगळण्यासाठी /

इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी – अर्ज क्र.7

* मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्त्यांसाठी- अर्ज क्र.8

* ज्यावेळी एकाच मतदारसंघात निवासस्थान एका ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थानांतरित झाले

असल्यास- अर्ज क्र. 8- अ नागरिकांनी परिपूर्ण भरुन मतदान केंद्राधिकारी तसेच

उपजिल्हा निवडणूक अधिकारी, तालुकास्तरीय निवडणूक अधिकारी आदीकडे सादर करण्यात यावेत.