Published On : Tue, Jul 17th, 2018

शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून सत्ता पक्ष आणि विरोधक सामोरा समोर

Nagpur: राज्य सरकारच्या प्रस्तावित असलेल्या अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेेल्या शिवाजी महाराजांच्या स्ममारकाच्या उंचीवरून आज विधानसभेत विरोधक आणि सत्ता पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. ‘

विरोधकांनी घातलेला गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. यानंतर विरोधकांनी सभागृहाबाहेर येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांचं निलबंन केल्या शिवाय सभागृह चालू देणार नाही असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. मुळ विषय पत्रिकेतील कामकाज बाजूला पडून भलते सलते विषय काढले जातात असे अतुल भातखळकर सभागृहात बोलले होते.

युती सरकार हाय हाय, असे म्हणत त्यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला. जी शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करत आहे. त्या शिवसेनेला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे हे आता सिद्ध झाले आहे. असा आरोपही त्यांनी केला.

तर दुसरीकडे सत्ता पक्षातील सदस्यांनी विरोधकांनाचं धारेवर धरले. 15 वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत असनाऱ्या आघाडी सरकार स्मारक उभारू शकले नाही. स्मारकासाठी लागणाऱ्या परवानग्या हे लोक प्राप्त करु शकले नाही. अश्या लोकांना शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. विरोधक केवळ शिवाजी महाराजांच्या नावाने जनतेची दिशाभूल करत राजकारण करत आहे असा आरोपही भाजपाच्या आमदारांनी यावेळी केला.

दरम्यान, स्मारकाच्या आराखडयानुसार महाराजांच्या
पुतळ्याची उंची 121.2 मीटर असणार आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची 83.2 मीटर तर त्यांच्या हातातील तलवारीची उंची 38 मीटर ठेवण्यात येणार होती. पण, राज्य सरकारने या पुतळ्याच्या बांधकाम खर्चात कपात करण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार पुतळ्याची उंची 83.2 मीटर ऐवजी 75.7 मीटर करण्यात येणार आहे. तर तलवारीची उंची 38 मीटर ऐवजी 45.5 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुतळ्याची एकूण उंची 121.2 मीटर एवढीच राहणार आहे.