नागपूर: नागपूरमध्ये 155 कोटी रुपयांच्या बनावट बिल रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. क्राईम ब्रँचनं कबाडी व्यापारी बंटी साहू यांच्या कार्यालयावर छापा टाकत अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. या कागदपत्रांमधून हवाला व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग रॅकेटचे धागेदोरेही उघड झाले आहेत. सध्या तपासात 87 बनावट कंपन्यांचा तपशील समोर आला असून, अंदाजे 1000 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंटी साहू ‘साक्षी फूड्स’ नावाची बनावट कंपनी स्मॉल फॅक्टरी एरियामधून चालवत होता. क्राईम ब्रँचला तिथून बँक पासबुक्स, गुंतवणूक नोंदी, बनावट कंपन्यांची कागदपत्रं आणि हवाला व्यवहारांशी संबंधित पुरावे सापडले आहेत.
बंटीसह त्याचा भाऊ जयेश साहू, वृजकिशोर मनियार, ऋषी लखानी आणि आनंद हरडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तपासात उघड झालं आहे की या रॅकेटचे मास्टरमाइंड बंटी साहू आणि वृजकिशोर मनियार होते. त्यांनी 15-20 जणांची टीम तयार केली होती, ज्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आणि कॉमर्स पदवीधारकांचा समावेश होता.
पोलिसांनी बंटी आणि त्याच्या कुटुंबाचे आठ बँक खातं फ्रीझ केले असून त्याचा फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. या रॅकेटच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांनी काळा पैसा पांढरा केल्याचे समोर आल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सध्या पोलिसांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, ‘प्राईम ट्रेडर्स’, ‘त्रिशा ट्रेडर्स’ आणि ‘आशीष ट्रेडर्स’ या बनावट कंपन्यांची नावे समोर आली आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 160 कोटी रुपयांचे बनावट बिलिंग झाल्याचे उघड झाले आहे. या टोळीचे संबंध मनी लॉन्ड्रिंग आणि ऑनलाईन गेमिंगच्या गैरव्यवहारांशी असल्याचाही तपास सध्या सुरू आहे.