Published On : Thu, Apr 1st, 2021

१ एप्रिल पासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार

काही केन्द्रात सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत लसीकरण

नागपूर: केन्द्र शासनाच्या ‍दिशानिर्देशानुसार कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. नागपूरात खाजगी आणि शासकीय रुग्णालये मिळून एकूण ८६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

महापौर श्री.दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण केल्यामुळे आपले शहर कोरोनामुक्त शहराकडे वाटचाल करेल.

नागपूरात आतापर्यंत २,१८,५२८ नागरिकांनी लसीकरण केले आहे. यामध्ये ३७,४४३ आरोग्य सेवक, २५,०८७ फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षावरील १,०२,५५५ नागरिक आणि विविध आजाराने पीडित ३२,१९५ नागरिकांनी लस घेतली आहे. आता १ एप्रिल पासून लसीकरणाच्या मोहिमेत ६.५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.

अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की ४५ वर्षे व त्यावरील नागरिकांनी आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेंसच्या माध्यमाने लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल.

नागरिकांना नोंदणीसाठी http://www.cowin.gov.in/home वर login करावे लागेल. ज्यांना ऑनलाईन नोंदणीमध्ये काही अडचण येत असल्यास त्यांच्यासाठी सर्व दहा झोनमध्ये ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था असून नागरिकांनी जवळच्या मनपा झोन कार्यालयामधून नोंदणी करुन घ्यावी.

डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की लसीकरण मध्ये आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर, विविध आजारांने पीडित नागरिक तसेच ६० वर्षावरील नागरिकांना दूसरा डोज साठी प्राथमिकता दिली जाईल. तसेच ऑनलाईन नोंदणी करणा-या नागरिकांना सुध्दा प्राथमिकता देण्यात येईल. खाजगी रुग्णालयामध्ये शासनाव्दारे निर्धारित दर घ्यावे लागतील. शासकीय रुग्णालयामध्ये लस मोफत दिली जाणार आहे. त्यांनी सांगितले की ४६ खाजगी व ४० शासकीय रुग्णालयांमध्ये लस दिली जाईल. गुरुवारपासून मानेवाडा प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, शाहु गार्डन जवळ, डीप्टी सिग्नल प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, संजयनगर हिन्दी मनपा शाळेजवळ नवीन लसीकरण केन्द्र सुरु होत आहे.

दोन पाळीमध्ये लसीकरण
नागरिकांच्या सुविधेसाठी लसीकरणाची व्यवस्था दोन पाळीमध्ये शासकीय व मनपाच्या रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये बाबुलबन प्राथमिक नागरि आरोग्य केन्द्र, के.टी.नगर प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्र, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एम्स, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व स्व. प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केन्द्राचा समावेश आहे. या केन्द्रांवर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरणात एन.जी.ओ चे सहकार्य
मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी व श्री. संजय निपाणे यांनी बुधवारी एन.जी.ओ.च्या प्रतिनिधींसोबत लसीकरणाला चालना देण्यासाठी बैठक घेतली. त्यांनी एन.जी.ओ.च्या प्रतिनिधींना शासकीय लसीकरण केन्द्रात आरोग्य विभाग मनपा व शासकीय चमूंना मदत करण्याचे आवाहन केले तसेच केन्द्राची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. प्रतिनिधींनी त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

बैठकीत मनपाचे उपायुक्त श्री.निर्भय जैन व श्री. मिलिंद मेश्राम सुध्दा उपस्थित होते. या बैठकीत रोटरी क्लब, लायन्स क्लब, टूगेदर वी कॅन, पूर्वा, मैत्री परिवार, महाइंद्र वेलफेयर फाऊंडेशन, लोकमान्य सास्कृतिक व क्रीडा मंडळ, बडी मारवाड माहेश्वरी पंचायत युवा संगठन, विभा फाऊंडेशन, गॅप, पंजाब सेवा समाज यांचे पदाधिकारी व एन.वी.सी.सी.चे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, श्रीमती अनुसया काळे छाबरानी, नीरजा पाठनिया इत्यादी उपस्थित होते. समर्पण सेवा समिती, वि टू फाऊंडेशन, लायन्स क्लब यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची तयारी दर्शविली.