Published On : Mon, Oct 7th, 2019

स्वातंत्र्य, समता व बंधुता ही संविधानाची शिकवण – दिनेश वाघमारे

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्धांच्या पंचशीलाच्या माध्यमातून जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण दिली. या शिकवणीच्या आधारवर भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यामुळे आज भारतीय संविधान जगात श्रेष्ठ संविधान असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केले.

कास्ट्राईब महासंघाच्या 39 व्या अधिवेशनाचे वार्षिक उद्घाटन प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ विधिज्ञ प्रभाकर मारपकवार,महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे , सरचिटणीस नामदेवराव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रधान सचिव दिनेश वाघमारे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावास कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या प्रयत्नामुळे खाजगीकरण रोखण्यात यश आले आहे. मी सुद्धा संत चोखामेळा वसतिगृहात राहून प्रगती केली. अॅट्रासिटी ॲक्टची अंमलबजावणी करण्यात कास्ट्राईब महासंघाने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे स्वयंरोजगाराकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.

विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी कोणत्याही प्रशासकीय अडचणी आल्यास केव्हाही चर्चेसाठी येण्याचे आवाहन करून ते म्हणाले, कास्ट्राईब महासंघाने कर्मचाऱ्यांबरोबरच सामाजिक प्रश्न सुद्धा सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही बाब गौरवास्पद आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानामुळेच आपल्या देशातील लोकशाहीला बळकटी मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. यशवंत मनोहर यांनी देशात सुरु असलेल्या मॉब लीचिंगचा प्रकार गंभीर आहे. निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अशा काही प्रकरणांमुळे लोकशाही दाबल्या जात असल्यामुळे संघटनेने दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

महासंघ व कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी समाज कल्याण विभाग स्थापनेचा इतिहास सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळाचा विकास करण्यासाठी संघटनेने प्रयत्न केल्यानंतर कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे दिव्यांग शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक सरचिटणीस नामदेवराव कांबळे यांनी तर आभार सुभाष गायकवाड यांनी मानले.

अधिवेशनास जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे, नरेंद्र धनविजय, राजकुमार रंगारी, जगन्नाथ सोरते आदी पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशनाला राज्यातून सुमारे 5 हजार कार्यकर्ते उपस्थित होते.