Published On : Fri, May 11th, 2018

राज्यात ५४ हजार व्यक्तींचे मोफत स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण – आरोग्यमंत्री

Advertisement

मुंबई : राज्यात अतिजोखमीच्या रुग्णांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत दिली जाते. आतापर्यंत गेल्या पाच महिन्यामध्ये 41 हजार गरोदर मातांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत देण्यात आली असून त्या व्यतिरिक्त मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या 9 हजार आणि आरोग्य कर्मचारी अशा एकूण 54 हजार व्यक्तींना ही लस देण्यात आली आहे.

राज्य साथरोग प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या शिफारशीनुसार अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सध्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना ही लस देण्यात येत आहे.

साधारणत: मार्च ते मे या काळात स्वाईन फ्लू लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यासाठी ही लसीकरण मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. 2015 पासून ही मोहीम सुरु असून यावर्षी त्या अंतर्गत 54 हजार रुग्णांना लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 42 हजार 492 व्यक्तींना ही लस देण्यात आली होती. यावर्षी जानेवारी ते 10 मे अखेर 54 हजार 216 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या राज्यात बाधित रुग्णांची संख्या केवळ 31 असून साधारणत: दररोज 8 हजारपेक्षा अधिक रुग्णांची राज्यभर तपासणी केली जात आहे. राज्यात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नसल्याची नोंद आहे.

41 हजार गर्भवती मातांचे लसीकरण
राज्यात फ्लू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून त्यांच्यावर वर्गीकरण करुन उपचार केले जात आहे. राज्यातील उपजिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील पाच शासकीय प्रयोगशाळांमार्फत मोफत निदान सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर 19 खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली आहे. स्वाईन फ्लूची लस देण्यासाठी अतिजोखमीच्या गटाचे वर्गीकरण करण्यात आले असून हृदयविकार व गंभीर फुफ्फुसाचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. पुणे विभागात सर्वाधिक (25 हजार) लसीकरण झाले असून त्या खालोखाल मुंबई (12 हजार), नागपूर (4 हजार), औरंगाबाद (3 हजार 500), कोल्हापूर (2 हजार) याप्रमाणे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये सुमारे 41 हजार गर्भवती मातांचा समावेश असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.