नागपूर : शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसाचा वेश घेऊन एका तरुणाकडून तब्बल २८ हजार रुपये बळकावण्यात आले. मात्र, पीडिताच्या जागरूकतेमुळे आरोपी फार काळ फरार राहू शकला नाही. पोलिसांनी अवघ्या एका तासात त्याला बेड्या ठोकल्या.
ही घटना शनिवारी दुपारी लालगंज परिसरात घडली. करण पखाले हे आपल्या दुचाकीवरून जात असताना आरोपी सुधीर लोखंडे याने त्यांना अडवले. स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत त्याने वाहन साईडला घेण्यास सांगितले. त्यानंतर डिक्की तपासल्याच्या बहाण्याने त्यातील २८ हजार रुपये उचलले. एवढेच नव्हे, तर “तुमच्यावर ३६ हजार रुपयांचा दंड बाकी आहे, थेट पोलीस ठाण्यात चला” असे सांगून आरोपी तेथून निघून गेला.
दरम्यान, पखाले यांनी आरोपीचा फोटो व त्याच्या दुचाकीचा फोटो मोबाइलमध्ये काढला होता. त्यावरून शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. वाहन क्रमांकाच्या आधारे शोध सुरू करताच क्राइम ब्रांचच्या युनिट-३ च्या पथकाने शंकरनगर परिसरात लोखंडेला गाठून अटक केली.
तपासात समोर आले की, आरोपी हा बजाजनगरचा रहिवासी असून पूर्वी फुटपाथवर कपडे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्यावर आधीपासून फसवणुकीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.