Published On : Sat, Sep 5th, 2020

Nagpur Police: करोनाने एकाच दिवशी चार पोलिसांचा मृत्यू; नागपूर हादरलं

नागपूर: पोलीस दलात करोनाचा विळखा वाढत असून शनिवारी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी चार कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने पोलिसांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे. मृत कर्मचाऱ्यांमध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. दरम्यान, नागपुरात आतापर्यंत १० पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ( Coronavirus In Nagpur )

नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई प्रवीण साहेबराव सूरकर (वय ४३ ,रा. जम्बुदीपनगर ) यांची १ सप्टेंबरला प्रकृती खालावली. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी शीतल, मुलगा रोहित ,मुलगी शानवी आहे. पोलिस मुख्यालयातील महिला हेडकॉन्स्टेबल वत्सला राजू मसराम (वय ५४, रा.राजीवनगर पांढराबोडी) यांची ३१ ऑगस्टला प्रकृती खालावली. त्यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, मुलगी दीपाली आहे.

गणेशपेठ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पंढरीनाथ मडावी (वय ५२,रा.नवीन क्वॉटर्स,झिंगाबाई टाकळी) यांची २ सप्टेंबरला प्रकृती खालावली. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी मैना ,मुलगा प्रतीक, दोन मुली मोनाली व मिताली आहेत. याचप्रमाणे नागपूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत सुनील बाबूराव सेलुकर यांचाही वानाडोंगरीतील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये उपचाराचदरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, उपराजधानी नागपुरात करोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. त्यातच बंदोबस्तावरील पोलिसांना या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. नागुपरात एकाच दिवशी करोनामुळे चार पोलीस दगावल्याने सगळेच हादरले आहेत. नागपुरात आतापर्यंत १० पोलिसांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. त्यामुळे चिंता वाढत चालली आहे