Published On : Sat, Nov 25th, 2017

ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी अरुण पाटणकर यांचे निधन

Advertisement

Arun Patankar Death
नागपूर: ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे निवृत्त सभापती अरुण मोरेश्वर पाटणकर यांचे निधन झाले ते 80 वर्षाचे होते. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या सोबत मुंबई येथे वास्तव्याला असतांना त्यांचे निधन झाले.

ज्येष्ठ सनदी अधिकारी अरुण पाटणकर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1973 या बॅचचे अधिकारी असून त्यांच्या मागे पत्नी विजया ताई पाटणकर, मुलगी मनिषा म्हैसकर, मुलगा आयकर विभागाचे आयुक्त अभिजीत पाटणकर तसेच प्रधान सचिव तथा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद म्हैसकर (जावई) व बासुरी दत्ता-पाटणकर सून आदी आप्तपरीवार आहे.

अरुण पाटणकर हे भारतीय प्रशासकीय सेवेचे वरीष्ठ अधिकारी असून एक रुबाबदार व आकर्षक व्यक्तिमत्व तसेच इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व त्यामुळे ते ब्रिटीश ऑफिसर म्हणून ओळखले जात होते. 1960 मध्ये पत्नी विजया पाटणकर यांना शासकीय विज्ञान महाविद्यालयात नोकरी करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला होता तसेच मुलगी उच्च माध्यमिक परिक्षेत मेरिटमध्ये येऊनही त्यांनी कायद्याच्या अभ्यासक्रमासोबत भारतीय प्रशासकीय सेवेसाठी प्रोत्साहन दिले.

धरमपेठेतील पाटणकर यांच्या बंगल्या सभोवताली बांबूसह विविध प्रजाती लावून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांचे महत्त्वपुर्ण योगदान आहे. गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतांना मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व स्मृती वनाची संकल्पना यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचा राज्यशासनाने वनश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकामध्ये विविध विषयावर त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे.

नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती, अमरावती महानगरपालिकेचे पहिले आयुक्त तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक येथील त्यांची कारकिर्द अत्यंत यशस्वी असून त्यांनी या तिन्ही विभागांना नवी ओळख दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास विभाग तसेच उपसचिव या पदावर काम केले आहे.

नागपूर शहरातील पायाभूत सूविधा तसेच शहराच्या विविध भागात सार्वजनिक उद्यानांची निर्मिती श्री पाटणकर यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे झाली असल्यामुळे नागपूर ग्रीन सिटी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. नागपूर शहरातील वारसा जतन करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या हेरिटेज समितीचे अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून या पदावरही श्री पाटणकर यांनी विविध वारसा स्थळाचे जतन करण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका बजावली आहे.