मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा वापर करून ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लाड यांच्या बनावट लेटरहेडवर, खोट्या सह्यांनी आणि त्यांच्याच आवाजात एआयच्या माध्यमातून फोन करून निधी तातडीने वर्ग करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, रत्नागिरीतील अधिकाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकारानंतर लाड यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांनाही याबाबत माहिती दिली आहे. तपासात आतापर्यंत चार जणांची नावे समोर आली असून, त्यातील एक बंडू नावाचा सरपंच असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
विधानपरिषदेत बोलताना लाड यांनी या घटनेचा उल्लेख करत, आमदार निधी राज्याच्या कुठल्याही भागात वर्ग करता येतो, याचाच गैरफायदा घेऊन फसवणूक करण्यात आली, असे सांगितले. त्यांनी अशी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी केली.
या घटनेत फसवणुकीचा अनुभव राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि निरंजन डावखरे या आमदारांनाही पूर्वी आला असल्याचे लाड यांनी सांगितले. सभापती राम शिंदे यांनी हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत सरकारने यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.