Published On : Mon, Apr 2nd, 2018

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामास वेग देण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

Advertisement

मुंबई: कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामास वेग द्यावा, महसूल आणि वन विभागाने यासंबंधीची आवश्यक ती कार्यवाही गतीने पूर्ण करावी व प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर न्याय द्यावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

आज मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माधव भंडारी यांच्यासह महसूल आणि वन विभागाचे अधिकारी तसेच कोयना धरण प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे पुनर्वसन करण्याचे निश्चित करण्यात आले त्यानुसार काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले अद्याप काही जणांचे बाकी आहे.

त्यांच्याबाबतीत महसूल विभागाने पुनर्वसनासाठी जमीन द्यावी, निर्वनीकरण झालेल्या जमिनीचे वाटप तत्काळ करण्यात यावे किंवा नवीन जमीन खरेदी करून त्यांचे पुनर्वसन करावे, या तीन पैकी जो पर्याय योग्य वाटतो त्याचा स्वीकार करून या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा, महूसल विभागाने यात पुढाकार घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले. प्रकल्पग्रस्तांच्या नावांचे संकलन रजिस्टर अद्ययावत करा, पात्र व्यक्तींचे नियमाच्या चौकटीत राहून वेळेत पुनर्वसन करा असेही त्यांनी सांगितले.