| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Apr 2nd, 2018

  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीदिनानिमित्त चैत्यभूमी येथे आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे भेट देतात. यावर्षी 127 व्या जयंतीनिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

  मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांनी घेतली. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला लागणाऱ्या सोयी सुविधांबाबत सर्व संबंधित विभागांनी उचित कार्यवाही करावी. चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच चैत्यभूमी स्मारक संरक्षण भिंतीलगत काँक्रिट टेट्रापॅाड टाकण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले.

  महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. तसेच समन्वय समितीच्या वतीने नागसेन कांबळे यांनीही सेवा सुविधांबाबतचे निवेदन वाचून दाखविले.

  या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे व सदस्य तसेच विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145