Published On : Fri, Sep 28th, 2018

लक्ष्‍यभेदी हल्‍ल्‍याच्‍या द्विवर्षपूर्तीनिमित्‍त सोनेगाव येथे स्‍टेटीक डिसप्‍ले प्रदर्शनाचे आयोजन

Advertisement

नागपूर : नियंत्रण रेषेपलीकडच्‍या दहशतवादी तळावर 29 सप्‍टेंबर 2016 रोजी भारतीय लष्‍कराने केलेल्‍या लक्ष्‍यभेदी हल्‍ल्‍याच्‍या द्विवर्षपूर्तीनिमित्‍त दिनांक 28 ते 29 सप्टेंबर 2018 दरम्‍यान नागपूरातील भारतीय हवाई दलाच्‍या सोनेगाव स्‍टेशन येथे हेलीकॉप्‍टर, विमान, वैमानिकांची उपकरणे, शस्‍त्रास्‍त्र यांचे प्रदर्शन (स्‍टेटील डिसप्‍ले) आयोजित करण्‍यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत हे प्रदर्शन सर्वसामान्‍यांना पाहण्‍यासाठी खुले राहणार आहे.

भारतीय लष्‍कर या घटनेच्या द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात ‘पराक्रम पर्व’ साजरे करत आहे. आज नागपूरात पहिल्‍या दिवशी नागपूरातील विविध शालेय विद्यार्थ्‍यांनी प्रदर्शनस्‍थळास भेट दिली व भारतीय वायू सेनेच्‍या पराक्रमाचे क्षण अनुभवले.

सोनेगाव येथील एअर फोर्स स्‍टेशनमध्‍ये लष्करी अभियानात वापरली जाणारी लढाऊ विमाने, हेलिकॉप्‍टर यांचे प्रदर्शन तसेच वैमानिक व हवाई दलाचे जवान वापरत असलेली उपकरणे, शस्‍त्रास्‍त्रे यांचे प्रदर्शन लावण्‍यात आले आहेत.स्‍टेशनच्‍या प्रवेशद्वारा जवळच जवान राहत असलेल्‍या बंकराची प्रतिवृती, सेल्‍फी पॉईटस्, तसेच प्रतिक्रिया नोंदवण्‍यासाठी ‘रायटींग वाल्‍स’ उभारण्‍यात आल्‍या आहेत. हवाई दलाच्या अधिका-यांनी या प्रदर्शनादरम्यान चित्रफित तसेच संभाषणाच्‍या माध्‍यमातून भारतीय वायूसेनेचा इतिहास व कामगिरी उपस्थितांना विषद केली.

या प्रदर्शनाला उपस्थित विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या प्रतिक्रिया रायटींग वॉलवर नोंदवल्‍या. ‘देश भारतीय सेनेवर गर्व करतो, तुम्‍ही आहात म्‍हणून आम्‍ही सुरक्षित आहोत, मी भारतीय असल्‍याचा अभिमान आहे’, अशा उत्‍स्फृर्त प्रतिक्रिया याप्रसंगी शालेय विद्यार्थ्‍यांनी नोंदवल्‍या.

सर्व भारतीय नागरिकांना हे प्रदर्शन सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान 29 सप्‍टेंबर पर्यंत पाहण्‍यासाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनस्‍थळी नागरिकांना छायाचित्र असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, डायव्हिंगचा परवाना किंवा भारत सरकारने प्रमाणित केलेले कोणतेही वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्‍यक आहे.