Published On : Wed, Jun 6th, 2018

पुढील आठ दिवसात नाले सफाईची सर्व कामे मार्गी लावा

Advertisement

नागपूर: दोन दिवसांवर पावसाळा येत आहे. नाले सफाई संदर्भातील सर्व कामे पुढील आठ दिवसात मार्गी लावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मंगळवारी (ता.६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नाले सफाई आणि नदी स्वच्छता अभियानासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभुळकर, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, झोन सहायक आयुक्त सर्वश्री राजेश कराडे, प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरिश राऊत, राजू भिवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी शहरातील नाले सफाईचा आढावा आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार यांच्या मार्फत मागवला. शहरात एकूण २३६ मोठे नाले आहेत. त्यापैकी १७२ नाले मनुष्यबळाच्या साहायाने तर ६४ नाले मशीन्सच्या साह्याने स्वच्छ करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील आठ दिवसात संपूर्ण नाले संपूर्ण स्वच्छ होतील, अशी माहिती डॉ.दासरवार यांनी दिली. यानंतर महापौरांनी झोननिहाय नाले सफाई व नदी स्वच्छतेचा आढावा झोनल अधिकारी यांच्या मार्फत घेतला.

यासोबतच आयआरडीपीचे नाले, चेंबर तसेच चेंबर स्वच्छ करण्याची माहिती झोनल अधिका-यामार्फत जाणून घेतली. ८० टक्के चेंबर स्वच्छ करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती डॉ.दासरवार यांनी दिली. यासोबतच नदी स्वच्छता अभियानाचा झोन निहाय आढावा घेण्यात आला.

याबाबत बोलताना दोन दिवसावर पाऊस येऊन ठेपला असल्याने काम अद्याप पूर्ण न झाल्याने महापौर नंदा जिचकार यांनी संताप व्यक्त केला. पुढील आठ दिवसात कामे पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश दिले. ज्या ठिकाणी मनुष्यबळाने शक्य होत नसेल त्याठिकाणी मशीन्सचा वापर करावा, अशा सूचना केल्या. ज्या ठिकाणी रेल्वेच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला आयुक्तांमार्फत पत्र पाठवून ते काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर नंदा जिचकार यांनी केल्या. पावसाळ्यात पाणी साचू नये याकरिता प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाचा आढावा महापौरांनी यावेळी घेतला.