Published On : Thu, Sep 7th, 2017

प्रादेशिक सेनेच्या पर्यावरण दलासाठी माजी सैनिकांसाठी कोल्हापुरात भरती

File Pic

कोल्हापूर: कोल्हापुरातील कृषि महाविद्यालयाच्या पटांगणात 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 136 इन्फन्ट्री बटालियन (टी.ए.) महारच्यावतीने पर्यावरणीय दलासाठी राज्यस्तरीय भरती होणार आहे. प्रादेशिक सेनेतील या भरतीसाठी केवळ सैन्यदलातून निवृत्त झालेल्यांनाच अर्ज करता येणार असून संपूर्ण महाराष्ट्र राज्याची भरती कोल्हापुरात होणार आहे.

भरती प्रक्रिया झाल्यानंतर 136 टी.एस.बटालियनचा तळ औरंगाबादमध्ये असेल. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार निवृत्त सैनिक असणे आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. ही भरती 14 आणि 15, 16 आणि 17, 18 आणि 19 सप्टेंबर अशी तीन टप्प्यात होणार असून प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी होणार आहे.

भरतीसाठी पात्रतेच्या अटी आणि वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे- सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर 5 वर्षाच्या आतील सर्व जवान आणि जे सी ओ यांना अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा याप्रमाणे-माजी सुभेदार 48 वर्ष, माजी नायब सुभेदार/हवालदार 45 वर्ष, माजी सैनिक 42 वर्ष वयाच्या 50 वर्षापर्यंत त्यांना सेवा बजावता येणार आहे. सेवानिवृत्तीवेळी कोणत्याही पदावरती असलेल्या उमेदवाराला शिपाई म्हणूनच भरती केले जाईल तर ज्युनिअर कमिशंड ऑफिसर यांना नायब सुभेदार म्हणून भरती केली जाणा आहे. सैन्य दलातून सेवानिवृत्ती झालेल्यांना पहिल्यांदा दोन वर्षासाठी रुजू करुन घेण्यात येईल. त्यानंतर त्या व्यक्तीचे कार्य तपासून एक वर्षासाठी त्यात वाढ करण्यात येईल. जर त्यांचे कार्य असमाधानकारक असेल तर कार्यमुक्त केले जाईल. अर्जदार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अपेक्षित आहे तसेच त्याचे चारित्र्य स्वच्छ असावे. अर्जदार विरोधात एफ.आय.आर/पोलीस तक्रार झालेली असून नये तसेच त्याला कोणत्याही न्यायालयाने शिक्षा दिलेली असू नये.

एकापेक्षा अधिक विवाह केलेल्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जदार केवळ महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अपेक्षित आहे. भरती केवळ गुणवत्तेवर आणि उपलब्ध जागांच्या आधारावरच केली जाणार आहे. या ठिकाणी झालेली सेवा कोणत्याही पेन्शनसाठी पात्र होणार नाही. अपात्र आणि अयोग्य अर्जदारांना सेवेतून कमी केले जाईल. पात्र अर्जदारांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

शारीरिक पात्रता- किमान 160 सेंटीमीटर उंची, वजन किमान 50 किलो, छाती 82 सेंटीमीटर. शारीरिक क्षमता- 7 मिनिट 9 सेकंदमध्ये 1 मैल धावण्याची क्षमता, 9 फूट लांब उडी, उंचीवरील मचाणांवर चालण्याची क्षमता, वयोमानानुसार बिम हाताळण्याची क्षमता.

ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी होणार असून सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया कोल्हापुरात राबवली जाणार आहे. भरतीमध्ये पात्र उमेदवारांची 136 टी ए बटालियन औरंगाबाद मध्ये ठेवली जाईल.

दि. 14 आणि 15 सप्टेंबर 2017 या दोन दिवसात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यासाठी भरती पक्रिया राबविण्यात येणार आहे.

दि. 16 व 17 सप्टेंबर 2017 रोजी औरंगाबद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरातच भरती प्रक्रिया होणार आहे.

दि. 18 आणि 19 सप्टेंबर 2017 या दोन दिवशी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात भरती प्रक्रिया होणार आहे.