Published On : Sat, May 22nd, 2021

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी विविध वैद्यकीय संघटनांशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा

Advertisement

म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी यंत्रणा अद्यावत करणार
आयएमएच्या माध्यमातून ग्रामीण भागातील डॉक्टरांचे जाळे
बाल रोग तज्ज्ञांच्या माध्यमातून कॉमन प्रोटोकॉल तयार करणार

नागपूर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेली जीवित हानी व आरोग्य यंत्रणेवर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील उपचाराचे जाळे आणखी भक्कम करणे सुरू केले आहे. आज दिवसभरात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘आयएमए’ पदाधिकारी, म्युकरमायकोसिस आजाराशी संबधित नेत्र, दंत व नाक, कान, घसा तज्ञ तसेच बाल रोग तज्ञ यांच्यासोबत बैठकी घेऊन प्रशासनाने तिसऱ्या लाटेची लढण्याची रणनीती आखणे सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज दुपारी चार वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. शेलोकार यांच्यासह जिल्हा आरोग्य यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते. आयएमए ( इंडियन मेडिकल असोशिएशन )पदाधिकारी व ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाइन बैठक घेतली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे माजी अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये कोरोना, म्युकरमायकोसिस व अन्य आजारासंदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी संघटनेच्या गपदाधिकाऱ्यांनी पुढे यावे, त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण व वैद्यकीय उपचाराबाबत चर्चा करण्यात आली.

सायंकाळी पाच वाजता म्युकरमायकोसिस संदर्भातील टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीला डॉ. मिलिंद भुरसंडी, डॉ. रामकृष्णा शिनॉय, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. आशिष दिसावाल यांची उपस्थिती होती. या आजारावर ग्रामीण भागात कसे नियंत्रण मिळवावे, लसीचा पुरवठा नसेल तर पर्यायी कोणता औषधोपचार करता येईल, ग्रामीण भागातील डॉक्टरांना या संदर्भातील प्रशिक्षण कसे देता येईल? या आजारासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर तिचा पुरवठा करण्यासाठी कोणत्या अटी व शर्ती ठेवाव्यात. तसेच त्यावर नियंत्रण ठेवणारी उपसमिती कशी असेल, यासंदर्भात चर्चा झाली.

सायंकाळी सहा वाजता डॉ. सतीश देवपुजारी डॉ. वसंत खळटकर यांच्या उपस्थितीत जिल्हाभरातील बालरोग तज्ज्ञांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा वेळी कोरोना पासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखण्यात याव्यात. याबाबत चर्चा झाली. तसेच यावेळी उपचारासाठी कॉमन प्रोटॉकल तयार करण्याची तयारी तज्ज्ञांनी दाखवली.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर सध्या आरोग्य यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबतच खाजगी वैद्यकीय प्रॅक्टिसनर्स यांचीही मदत घेत असून ग्रामीण भागातील वैद्यकीय उपचार पद्धतीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.