Published On : Fri, Apr 10th, 2020

गरजूंना अन्नदानासाठी मनपामध्ये ‘फूड झोन’

मनपाच्या महिला कर्मचारी करताहेत भोजन पॅकिंग : पहिल्याच दिवशी एक हजार गरजूंपर्यंत पोहोचविले अन्न

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान शहरात अडकलेली कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने गरजूंना जेवण पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनपाच्या या कार्यात आतापर्यंत ५० स्वयंसेवी संस्थांनीही सहकार्य दिले आहे. या सेवा कार्याची गती वाढवून जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळावा यासाठी शुक्रवारी (ता.१०) मनपा मुख्यालयामध्ये ‘फूड झोन’ तयार करण्यात आले आहे. या ‘फूड झोन’मध्ये मनपाच्या कर विभागाच्या महिला कर्मचारी जेवण पॅकिंगचे काम करीत आहेत तर पुरूष कर्मचा-यांमार्फत हे जेवण गरजूंपर्यंत पोहोचविले जात आहे. शुक्रवारी (ता.१०) पहिल्याच दिवशी एक हजार गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्यात आले आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात मनपातर्फे विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरातील बेघर, निराधार व्यक्तींची भोजन व्यवस्था केली जात आहे. या कार्यासाठी प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या नेतृत्त्वात मनपाची संपूर्ण चमू कार्यरत आहे.

मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दुस-या माळ्यावर मनपातर्फे ‘फूड झोन’ तयार करण्यात आले आहे. मनपाच्या स्थानिक संस्था कर आणि मालमत्ता कर विभागाचे ८० कर्मचारी बेघर, निराधार, गरजूंना जेवण मिळावे यासाठी कार्य करीत आहेत. सर्व कर्मचारी टप्प्याटप्प्याने ‘सोशन डिस्टसिंग’चे पालन करीत सेवाकार्य करीत आहेत. या कार्यासाठी दोन स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या आहेत.

लॉकडाउन दरम्यान कुणीही उपाशी राहू नये याकरिता स्वामी नारायण मंदिर संस्थेतर्फे मनपाला पोळ्यांची तर रतन पॅलेस गणेशपेठ सोसायटी या संस्थेतर्फे भाजीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. दोन्ही संस्थांकडून दररोज येणारे जेवण मनपाच्या ‘फूड झोन’मध्ये स्थानिक संस्था कर व मालमत्ता कर विभागाच्या महिला कर्मचा-यांकडून पॅक केले जाते. पॅक झालेले जेवणाचे डबे दोन्ही विभागाचे पुरूष कर्मचारी गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. शुक्रवारी (ता.१०) पहिल्याच दिवशी सर्व कर्मचा-यांतर्फे एक हजार जेवणाचे डबे तयार करण्यात आले व ते गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.

गरजूंनी मनपाशी संपर्क साधा
निराधार, बेघर व ज्यांच्याकडे जेवणाची सुविधा नाही अशा व्यक्तींकरीता मनपाद्वारे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ज्यांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होउ शकत नाही, अशा गरजू व्यक्तींनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.