Published On : Mon, Apr 20th, 2020

सत्तावीस दिवसांपासून बुटीबोरी येथे गरजवंताना भोजनदान

बुटीबोरी :- “कर्मयोगी फाऊंडेशन” बोलते नव्हे तर,कर्ते व्हा या तत्त्वावर गेल्या कित्येक वर्षा पासून बुटीबोरी व सभोवतलच्या परिसरात सामाजिक कार्य करीत आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात अचानक आलेल्या संकटमय परिस्थितीमुळे शासनाने लॉक डाऊन,जमावबंदी व संचारबंदी लागू केली.त्यामुळे सर्व उद्योग व कारखाने बंद असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे.अशा जीवघेण्या परिस्थितीमध्ये गरजू व गरीब व्यक्ती करिता कर्मयोगी फाऊंडेशन धाऊन आले आहे.

बुटीबोरी मधील मेट्रो कॉम्प्लेक्स मध्ये कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे या लॉक डाऊन मुळे ज्यांचे काम सुटले जे कामगार बेरोजगार झाले व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन पोहचली आहे अश्या गरजू लोकांना गत २७ दिवसंपासून भोजनदान करीत आहे.

भारतातच नव्हे तर जगात कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गरजवंत लोकांच्या जेवनाचे काय? या प्रश्नाने कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे व मार्गदर्शक तुलसीदास भानारकर यांच्या मनाला अस्वस्थ केले.म्हणून या गरीब,सकल जणांच्या सेवेकरिताच कर्मयोगी फाऊंडेशनने दि.२३ मार्च ते लॉकडाउन संपेपर्यत जेवनाची सोय करणार असा प्रण घेतला आहे.गरजू लोकांना लॉकडाउन कालावधीमध्ये पोळी,भाजी,कळी,भात,शिरा,शेव,पापड,लोणचे व रोज एक मिष्ठान असे महाराष्ट्रीयन भोजन सकाळी ९ वाजता पासून दुपारी २ वाजेपर्यंत दररोज १७५ ते २०० च्या दरम्यान रस्त्यावरील गरीब व गरजू व्यक्ती जेवणाचा आस्वाद घेत आहेत.आज या उपक्रमाला २७ दिवस पूर्ण झाले असुन हा नित्यक्रम लॉक डाऊन संपेपर्यंत असाच सुरू राहील.या पवित्र कार्याकरिता बुटीबोरी व परिसरातील दान दात्यानी रोख व धान्य स्वरूपात जाहीरपणे तर काहींनी गुप्तदान करून या फाऊंडेशन पर्यंत पोहचविल्यानेच कर्मयोगी फौंडेशन चे भोजनदानाचे कार्य अविरतपणे न थकता सुरू आहे.


महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार,नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत,रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कुपाल तुमाने,आमदार समीर मेघे,माजी मंत्री राजेंद्र मुळक,रमेशचंद्र बंग,नागपूर जिल्हापरिषद अध्यक्ष रश्मी बर्वे,महाराष्ट्र राज्य काँग्रेस महासचिव मुजीब पठाण,बुटी बोरी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण,यांच्या सह बुटीबोरीतील अनेकांनी या फाऊंडेशनला भेट दिली व आपले विचार या ठिकाणी व्यक्त करून सुरू असलेल्या या कार्याबद्दल संस्था अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या सह संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले व यांचे हे सेवाभावाचे कार्य असेच निरंतर चालत राहावे अश्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे, मार्गदर्शक तुलसीदास भानारकर,कार्याध्यक्ष वर्षा पारसे,सरचिटणीस शिवाजी बारेवर,विजय डोंगे,विशाल भोयर,शरद कबाडे सुनिल विश्वकर्मा,राजीव तायवाडे,नितिन सोनटक्के,अशोक ठाकरे,देविदास ठाकरे,वर्षा ठाकरे,धनराज मोडक,शेषराव पारसे,प्रविणा ठाकरे, शितल बारेवार,रुख्मा ठाकरे,संगीता मोडक, प्रीती कोल्हे, यौगेश कोल्हे आदीजन या भोजनदाना करिता अथक परिश्रम घेत आहे.

कर्मयोगी फाऊंडेशन हे कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आदर्श्याला डोळ्यासमोर ठेऊन नेहमी कार्य करत असते आज काळाने आपले रुद्ररूप धारण केले आहे व माणूस हा कुठेतरी परिस्थिती समोर दुबळा होत आहे. उपासमारीचे चटके आज त्याला सोसावे लागत आहे मध्यम वर्गीय व्यक्ती कसा बसा आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय करू शकत आहे पण मोल मजुरी करणारे हातावर आणून पानावर खणाऱ्याचे काय ?

त्यांच्या जेवणाचे काय? या प्रस्नाची उत्तरे शोधता सापडणार नाही या करीताच कर्मयोगी फाऊंडेशन मार्फत या लॉकडाऊन परिस्थिती मध्ये गोर गरिबांची मदत करण्याचा निर्धार आम्ही केला असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण आम्हास झाली नाही.बुटीबोरी मधील अनेकांचे सहकार्य या सामाजिक कार्यास प्राप्त होत आहे.कर्मयोगीच नव्हे तर बुटीबोरी मधील अनेक सामाजिक संस्था आज या बिकट परिस्थिती आप अापल्या पद्धतीने कार्य करीत या बिकट समस्येचा सामना करीत आहे.

पंकज ठाकरे,अध्यक्ष,कर्मयोगी फौंडेशन