Published On : Mon, Mar 8th, 2021

कडक लॉक़डाऊन टाळण्यासाठी नियम, शिस्त पाळा

Advertisement

– महापौर दयाशंकर तिवारी यांचे कळकळीचे आवाहन : बाजारात फिरून केली पाहणी


नागपूर : कोरोनाला नियंत्रणात आणायचे की त्याचा उद्रेक होऊ द्यायचा, हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. त्यामुळे शहराच्या आरोग्यासाठी प्रशासनाने काही आदेश काढले असतील तर त्याचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. हे ओळखून कडक लॉकडाऊन टाळण्यासाठी आदेशाचे काटेकोरपणे पालन करा, शिस्त पाळा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने काढले आहेत. शिवाय नागरिकांनीही आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले होते. आदेशाचे पालन किती प्रमाणात होत आहे, हे बघण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहरातील बाजारांचा दौरा केला. व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात दुकानदारांना आणि ग्राहकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागरिकांना आम्ही वारंवार निवेदन करीत आहोत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या जीवासाठी काळजी घ्यायला हवी. कोरोनाचा कॅरियर हा नागरिकच आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी किमान शनिवार, रविवारी बंदच्या दिवशी घराबाहेर पडू नये. घरात जर ज्येष्ठ नागरिक असतील आणि तुमच्याजवळ स्मार्ट फोन असतील तर त्यांच्या लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करण्याचे समाजकार्य त्यांनी घरी बसून करावे, असे आवाहनही महापौरांनी केले.

मांस, मटन विक्रीची दुकाने शनिवारी, रविवारी सुरू ठेवण्याचे प्रशासनाच्या आदेशात नमूद होते. तरीही काही ठिकाणी पोलिसांनी मांस, मटन विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच मी स्वत: आणि अतिरिक्त आयुक्त पोलिस अधिकाऱ्यांशी बोलले. त्यामुळे त्यांचा झालेला गैरसमज दूर झाल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.