Published On : Tue, Mar 31st, 2020

समाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा!

Advertisement

अन्नधान्याची मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आयुक्तांचे आवाहन

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकंडाऊन’ दरम्यान गरजू लोकांना अनेक स्वयंसेवी संस्था मदतीचा हात देत आहे. मात्र मदत पुरविताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊनदरम्यान हातावर पोट असणाऱ्यांना अडचणीतून जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, समाजसेवक अशा गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. रस्त्यांवर असणाऱ्या लोकांनाही अन्न पुरविले जात आहे. मात्र हे करताना काही ठिकाणी मदत घेण्यासाठी अनेक लोक एकत्र येत आहेत.

यामुळे कोरोनाचे समूह संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. समाजकार्य करायलाच हवे. मात्र, कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळायलाच हवे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसे न झाल्यास, दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.