नागपूर : मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचा नागपुरातून विमान प्रवास करणाऱ्यांवरही परिणाम होत आहे. गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपूर आणि आसपासच्या शहरातील अनेक कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते मुंबईला रवाना होत आहेत. त्यामुळे येथून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व उड्डाणे फुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर विमानाचे भाडेही गगनाला भिडले आहे.
नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह एवढा वाढला आहे की, महागडी तिकिटे खरेदी करूनही ते मुंबई गाठण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तिकिटांसाठी होणारी गर्दी पाहून विमान कंपन्यांनी अचानक भाडे वाढवले आहे. एका ट्रॅव्हल वेबसाइटच्या माहितीनुसार, फ्लाइटचे भाडे 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. एवढ्या महागड्या तिकिटांचा भार सहन न झाल्याने काही नेते आणि कार्यकर्ते रेल्वे आणि खासगी वाहनांचा वापर करून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपर्यंत नागपूर ते मुंबईचे भाडे 5000 ते कमाल 7000 रुपयांच्या दरम्यान होते, मात्र 4 आणि 5 डिसेंबरला ते थेट 20 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचले. विमान कंपन्या अशा संधीची वाट पाहत होत्या आणि संधी बघून त्यांनी दर वाढवले आहे. आता राजकारण्यांमुळे सर्वसामान्य प्रवाशांनाही महागड्या तिकीट प्रवासाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अचानक वाढलेल्या विमान भाड्यामुळे अनेक प्रवासी आपला प्रवास रद्द करत आहेत, तर आपत्कालीन परिस्थितीमुळे मुंबईत ये-जा करण्यासाठी लोकांना अनेक पटींनी जास्त भाडे मोजावे लागत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशनातही भाडे वाढणार –
शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या काही दिवसांतच विधिमंडळ पक्षाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा आहे. येथे मोठ्या संख्येने नेते भेट देतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा विमान कंपन्या त्यांच्या भाड्यात वाढ करणार आहेत.