Published On : Fri, Jan 12th, 2018

कारखाना घोटाळा; हुमणेंसह पाच निलंबित


नागपूर: मनपाच्या सेवेत धावत असलेल्या वाहनांचे सुटे भाग खरेदी, दुरुस्ती व देखभालीत घोटाळा झाल्याचे मान्य करीत अखेर महिन्याभरानंतर आयुक्तांनी आसीनगर झोनचे सहायक आयुक्त व कारखाना विभागाचे प्रभारी विजय हुमणेंसह दोन यांत्रिकी अभियंता व दोन वाहन निरीक्षकाला निलंबीत केले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांनी याप्रकरणी पुराव्यासह सभागृहात घोटाळा झाल्याचे उघडकीस आणले होते.त्यानंतर कार्याकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी १५ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते.

निलंबीत करण्यात आलेल्या उर्वरीतांमध्ये यांत्रिकी अभियंता उज्ज्वल लांजेवार, राजेश गुरमुळे, वाहन निरीक्षक विक्रम मानकर आणि मनिष कायरकर यांचा समावेश आहे. बाजारात अर्ध्यापेक्षाही कमी दरात उपलब्ध साहित्य विक्रीस असताना कारखाना विभागाने दुप्पट आण‌ि तिप्पट दराने खरेदी केल्याचे सहारे यांनी उघडकीस आणले. हा घोटाळा असून, यातून मनपाला कोटयावधीचा फटका बसला. सहारे यांनी यासाठी कारखाना विभागातर्फे त्यावेळीचे कारखाना विभागाचे दर, तेव्हाचे बाजारातील दर व आताचेही साहित्यदराचे अधिकृत वितरकाचे कोटेशन सादर केले. १४ हजारांचे टायर ट्युब तब्बल ८५ हजारांत खरेदी करण्यात आल्याची बाबही पुढे आली. यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराला कारखाना विभाग जबाबदार असून, या विभागाचे प्रमुख व यांत्रिक अभियंत्यास तातडीने निलंबित करावे, अशी मागणी सहारे यांनी सभागृहात लावून धरली होती.

मनपाची स्वतःची २०१ वाहने आहेत. या वाहनांची देखभाल व दुरुस्ती तसेच त्यांना लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्याचे अधिकार कारखाना विभागाला आहेत. यासाठी एकूण २४ विविध एजन्सी, कंपनी व ऑटोमोबाइल्ससोबत मनपाचा करार आहे. साहित्य खरेदी बाजारमूल्यापेक्षा कमी दराने असेल, असे मानूनच या कंपन्यांसोबत मनपाने खरेदीचा व्यवहार केला. प्रत्यक्षात मात्र या कंपनी व ऑटोमोबाइल्स मनपाकडून मोठ्या प्रमाणात वसुली करीत असल्याचे किंमतीवरून स्पष्ट होत आहे. सहायक आयुक्त विजय हुमणे यांनी दरकरारानुसार खरेदी व्यवहार होत असल्याचे सांगत पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला होता. २०१४ मध्ये ई-निविदेतून दर करार ठरला. त्यानुसार साहित्य खरेदी होत असल्याचे मांडत स्वतची सुटका करून घेण्याचा चोरटा प्रयत्नही केला. मात्र, सभागृह ऐकून घेण्यास तयार नव्हता. माजी उपमहापौर सतीश होले यांनी या कारखान्यात मनपाचे एकही वाहन दुरूस्त होत नाही, याकडे लक्ष वेधले होते. मग, खरेदी कशाची व कशासाठी असा प्रश्न उपस्थित करीत या खरेदी व्यवहारातून कमिशनखोरी झाल्याचा आरोपही केला होता. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनीही या घोटाळयाप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले होते.

सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी याप्रकरणाबद्दल येत असलेल्या तक्रारी व व्यवहारात अधिकाऱ्यांकडून चूक झाली व घोटाळा झाल्याचे सकृतदशंनी दिसत असल्याचे सांगत या तिन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. सहारे यांनी तर पिशवी भरून पुरावे सभागृहात दाखविले होते. घोटाळा झाला नसल्याचे दाखवून द्यावे अन्यथा हुमणेंनी राजीनामा द्यावा किंवा आपण देतो, असे थेट आव्हानच सहारे यांनी त्यावेळी दिले होते. त्यानंतर कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी हुमणेंसह दोन्ही यांत्रिकी ​अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी असे निर्देश दिले होते. त्यावेळी आयुक्त अश्विन मुद्ग्ल रजेवर होते. चौकशी करायची असल्याने व मधल्या काळात हिवाळी अधिवेशन असल्याने याप्रकरणाची चौकशी लांबली होती. अखेर वर्षारंभात आयुक्त मुद्गल यांनी ही कारवाई केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांनी आयुक्तांच्या निणंयाचे स्वागत करीत, अशा फोफावलेल्या भ्रष्टाचारावर अशीच कारवाई अपेक्षीत असल्याचे सां​गितले. मनपात इतरही विभागात भ्रष्टाचार वाढला असून, जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे. त्यावर नियंत्रण आणल्यास मनपाची आ​र्थिक गाडी रूळावर येण्यास वेळ लागणार नाही व बेजबाबदार तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यावर वचक बसेल असे सहारे यांनी सांगितले.

दोन वर्षांत असा झाला खर्च

वर्ष : २०१५-१६, खर्च : ९८,०४,९०९
वर्ष : २०१६-१७, खर्च : १,३३,३८,७६८
एकूण खर्च : २,३१,४३,६७७