Published On : Sat, Jul 7th, 2018

येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी पाच जण अटकेत

पुणे :येरवडा कारागृहातील तुरूंग अधिकारी मोहन पाटील यांच्यावर आज सकाळी भर रस्त्यात अज्ञातांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने पाटील या हल्ल्यातून बचावले. याप्रकरणी कारागृहात शिस्तीचा बडगा दाखवल्याने संतापलेल्या आरोपींनी संगनमत करुन तुरुंगाधिकारी मोहन पाटील यांच्यावर गोळीबार करुन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. निलेश संभाजी वाडकर, सुदर्शन संभाजी राक्षे, ओंकार चंद्रकांत बेनूसे, ऋषीकेश राजेश चव्हाण, आणि कुणाल कानडे अशी त्यांची नावे आहेत.

येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेल रस्त्यावर हा प्रकार घडला. पाटील हे सकाळी त्यांच्या घरून कारागृहाकडे निघाले होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. हल्ला करणारे दोघे हल्लेखोर स्कूटरवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक पुंगळी आढळली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.