नागपूर : शहरात आणखी पाच उड्डाणपूल तयार होणार असल्याची माहिती पूर्व नागपूरचे आ.कृष्णा खोपडे यांनी दिली. राज्य सरकारने या पाच उड्डाणपुलांसाठी ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून या उड्डाणपुलांच्या माध्यमातून पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडण्यात येणार आहे. या भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात हे पाच उड्डाणपूल तयार करण्याच्या मागणीने जोर धरला होता. महारेलतर्फे उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरदेखील मांडण्यात आला.
१२ जून रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीदरम्यान या उड्डाणपुलांना मान्यता देण्यात आली होती. राज्य शासनाकडूनदेखील या प्रकल्पासाठी ७९२ कोटींंच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून महारेल कंपनीचे एमडी राजेशकुमार जैस्वाल यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
रेशीमबाग ते के.डी.के. कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट – २५१ कोटी- चंद्रशेखर आझाद चौक- गंगाजमुना ते मारवाडी चौक – ६६ कोटी – लकडगंज पो.स्टे. ते वर्धमाननगर – १३५ कोटी – नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक – ६६ कोटी – वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड – २७४ कोटी या मार्गावर उड्डाणपूल तयार होणार आहे.