Published On : Thu, Sep 5th, 2019

पाचशे रुपये रोजंदारीने मोबाईल चोरी

झारखंडची टोळी जीआरपीच्या जाळ्यात,अडीच लाखांचे १९ मोबाईल जप्त

नागपूर : कामाच्या शोधात परप्रांतातील मजुर नागपुरात येतात. दररोज मजुरांचा जत्था उपरराजधानीत येत असतो. नवनिर्माण इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजुर रोजंदारीने काम करतात. श्रम करून कुटुंबाचा गाढा चालवितात. आता मात्र, मोबाईल चोरीसाठीही रोजंदारीने मजुर ठेवले जात असून त्यांना ५०० रुपये रोज दिल्या जातो. याकामासाठी शहरात झारखंड येथून ८ लोकांची टोळी आली होती. मागील काही वर्षांपासून गर्दीच्या ठिकाणीवरून ते मोबाईल चोरी करायचे. या टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी भंडाफोड केला आहे. चार आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून २ लाख ४९ हजार ३४७ रुपये किंमतीचे १९ मोबाईल जप्त केले. यात दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.

महाराजपूर, झारखंड येथील आठ मुले (दोन विधीसंघर्षग्रस्त बालक) नागपुरात मोबाईल चोरीसाठी आले. पिवळी नदी परिसरातील प्रबुध्दनगरात भाड्याने खोली घेवून ते राहात होते. नियमीत ते शहरातील गर्दीच्या ठिकाणी म्हणजे रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजार आदि ठिकाणावरून मोबाईल चोरी करायचे. त्यांनी २७ आॅगस्ट रोजी नागपूर रेल्वे स्थानकाहून मोबाईल चोरला. दुसºयाही दिवशी ते मोबाईल चोरीसाठी नागपूर स्थानकावर आले. मात्र, यावेळी लोहमार्ग पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांना ठाण्यात आणुन सखोल चौकशी केली असता यात आणखी लोक असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिवळीनदी परिसरात सापळा रचला. चौकशी करीत असतानाच आरोपी फरार झाले. काही दुर अंतरावर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. चितार ओळी महाल परिसरातून त्यांना पकडण्यात आले. त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. तर दोघे विधीसंघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. या टोळीकडून अडीच लाख रुपये किंमतीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले. यावेळी दोघे जन पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिस फरार आरोपींचा ा्रआणि मोरक्याचा शोध घेत आहेत. लवकरच फरार आणि यातील मोरक्या पोलिसांच्या जाळ्यात असेल. पोलिस कोठडीत असताना ५०० रुपये रोजीवर मोबाईल चोरीचे काम करीत असल्याची त्यांनी पोलिसांना कबूली दिली.

ही कारवाई पोसि अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घणश्याम बळप यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलिस हवालदार दीपक डोर्लिकर, सुरेश राचलवार, श्रीकांत धोटे, राजेश पाली, अरविंद शाह, विनोद खोब्रागडे, अमोल हिंगणे, विजय मसराम, अमित त्रिवेदी आणि रोशन अली यांनी केली.

महाराजपुरात चोरीचे प्रशिक्षण
साहेबगंज जिल्ह्यातील महाराजपूर, कल्याणी आदि परिसरात अल्पवयीन मुलांना आमिष दाखवून त्यांना दोन महिण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या कालावधीत गर्दीच्या ठिकाणी मोबाईल कसे चोरायचे या बध्दल फंडे दिले जातात. कधी काळी अडकल्यास त्यातून कसा मार्ग काढायचा याबध्दलही सांगितले जाते. या मोबदल्यात त्यांच्या पालकांना पैसे दिले जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

चोरीचे मोबाईल बांग्लादेशात
नागपूरसह अन्य शहरातही ही टोळी सक्रिय आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर तरबेज झाल्याचे लक्षात येताच त्यांना प्रत्यक्षात कामगिरीवर पाठविले जाते. चोरी करून आणलेले मोबाईल हावड्याला पाठविले जातात. येथून मालद्याला त्याची विक्री केली जाते. मालद्याहून बांग्लादेशात पाठविले जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.