Published On : Sun, Dec 8th, 2019

“फिट इंडिया मुव्हमेंट” सप्ताह 12 डिसेंबरपासून

· जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

· सेपाक टाकरा स्पर्धेचे जानेवारीत आयोजन

नागपूर : “फिट इंडिया मुव्हमेंट” अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हा क्रीडा परिषद कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत दिले. ही आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे जोपासना व्हावी, क्रीडाविषयक वातावरण निर्माण व्हावे, या दृष्टीने दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत दरवर्षी क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात येतो. समाजातील प्रत्येक नागरिकांनी शारीरिक स्वास्थ्याकरिता व्यायाम करावा अथवा खेळामध्ये भाग घ्यावा याकरीता केंद्र शासनामार्फत “फिट इंडिया मुव्हमेंट” कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी क्रीडा सप्ताहाच्या निमित्याने जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये शासनाने निश्चित केल्यानुसार विविध कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे.

सन 2019-20 या सत्रामध्ये क्रीडा व युवक सेवा संचानालय पुणे यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा सेपाक टाकरा संघटना, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीयस्तरावरही करण्यात येते. तसेच शालेय सेपाक टाकरा 17 वर्षे वयोगटातील मुले व मुली क्रीडा स्पर्धेचे नागपूर येथे डिसेंबर महिन्याच्या शेवटी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये देशभरातून एकूण 30 संघ सहभागी होणार असून, स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करुन क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ही स्पर्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.

“फिट इंडिया मुव्हमेंट”अंतर्गत दि. 12 डिसेंबर रोजी योगाभ्यास तसेच 13 डिसेंबर रोजी मनोरंजनात्मक खेळ लंगडी, लगोरी, लेझिम, संगीत खुर्ची, आंधळी कोशिंबीर, टिपऱ्या, लिंबू चमचा, मलखांब, खो-खो इत्यादी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 14 डिसेंबर रोजी सामूहिक कवायती, ऐरोबिक्स, झुंम्बा, डंबेल्स-रिंग कवायत तर दि. 15 डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धा आयोजनात धावण्याच्या विविध प्रकाराच्या स्पर्धा, कब्बडी, खो-खो, फुटबॉल इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 16 डिसेंबर रोजी प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धा हे विषय क्रीडा व आरोग्य, निरोगी जीवनशैली या अनुषंगाने असावेत. दि. 17 डिसेंबर रोजी खेलो इंडिया अंतर्गत शालेयस्तरावर शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल. तसेच दि. 18 डिसेंबर रोजी राज्य व राष्ट्रीय खेळाडूंशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात आहारविषयक, मानसिक आरोग्यविषयक तज्ञांचे मार्गदर्शन याचा समावेश आहे.