Published On : Mon, Dec 23rd, 2019

रेल्वे स्थानकावर थंडीचा पहिला बळी?

– नागपूर रेल्वे स्थानकावरील घटना


नागपूर: बेशुध्दावस्थेत आढळलेल्या एका ७० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. थंडीने गारठून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ही दुर्देवी घटना सोमवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. मृताची अद्यापही ओळख पटली नाही.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अजूनही पाहिजे तशी थंडी पडली नाही. तरीही रस्त्यावर बेघर आणि निराधारांना रात्र काढणे कठिण असते. निराधार लोक फुटपाथवर, बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर रात्र काढतात. थंडीपासून बचावासाठी सर्वांकडे गरम कपडे असतातच असे नाही. काही जन कुडकूडत रात्र काढतात. ज्यांना सामाजिक जान आहे, असे देवदूत मध्यरात्री शहरात फिरून थंडीत कुडकूडत असलेल्यां बेघरांच्या अंगावर गरम कपडे टाकून निघून जातात.

मात्र, रेल्वे स्थानकावर मृत झालेला वृध्दापर्यंत कोणाचेही लक्ष पोहोचू शकले नाही. कारण तो फलाट क्रमांक ७ वर होता. येथे प्रवासी येतात आणि जातात थांबण्यासाठी कोणाजवळही वेळ नसतोच. मृतकावच्या अंगात एकही कापड नव्हता. नग्न अवस्थेत त्याने रात्र काढली. त्याचे संपूर्ण शरीर गारठले होते.

सकाळी तो कुठल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नव्हता. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस घटनास्थळी गेले. तत्पूर्वी रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतकाचा सळपातळ बांधा, उजव्या खांद्याजवळ तिळ आणि दाढी मिशी वाढलेली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नोंद करून शवविच्छेदनासाठी पार्थिव मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल तेजराम वघारे करीत आहेत.