नागपूर: हरित महाराष्ट्र मिशनअंतर्गत यंदा सुमारे १३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य वन विभागाकडून ठेवण्यात आले आहे. मात्र, या मिशनअंतर्गत प्रत्यक्षात वृक्षलागवड किती झाली आहे, किंवा ती झाली आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी यंदा राज्याच्या काही भागात प्रथमच ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. ड्रोनच्या माध्यमातून उपलब्ध होणारी लागवड पूर्व आणि नंतरच्या छायाचित्रांच्या विश्लेषणातून नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे.
अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक एस. एस. पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, यंदा प्रथमच १ ते ३१ जुलै दरम्यान राबवल्या जाणाऱ्या या अभियानात प्रायोगिक तत्वावर काही भागात ड्रोनचा वापर सुरू करण्यात आला आहे. प्रामुख्याने यवतमाळ जिल्हा तसेच मराठवाड्यातील काही भागात ड्रोनच्या माध्यमातून एरियल सर्व्हेच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी तयार करण्यात आलेल्या क्षेत्राची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. यानंतर याच भागात वृक्षारोपणानंतरची छायाचित्र घेतली जाणार असून त्यातून वृक्षारोपणाचे नेमके लक्ष्य गाठण्यात आले अथवा नाही, याबाबतची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. छायाचित्रांचे विश्लेषण करून नेमकी उपलब्धी जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे.
उपग्रहाच्या माध्यमातून डाटा
ड्रोनच्या माध्यमातून माहितीसोबतच उपग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या डाटाचाही माहिती मिळवण्यासाठी वापर केला जाणार आहे. प्रत्यक्ष वृक्षारोपण स्थळावर जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता ही पद्धती उपयुक्त ठरू शकेल.
किरायाने मागवले ड्रोन
वृक्षलागवडीची माहिती घेण्यासाठी खासगी क्षेत्रातून किरायाने ड्रोन मागवण्यात आले असून संबंधित भागांत किती वृक्षलावगड झाली आहे याची माहिती ड्राेनच्या माध्यमातून घेण्यासाठी कोणत्या भागात कशी माहिती घ्यावयाची आहे त्यासाठी कालावधी ठरवला जात आहे. तसेच यासाठी खास नियोजन केले जात आहे.
