Published On : Tue, Oct 10th, 2017

फटाके विक्रेत्यांचे नुकसान होऊ देणार नाही

Advertisement

नागपूर : किरकोळ फटाके विक्रेत्यांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी दिले.किरकोळ फटाका विक्रेत्यांना तात्काळ परवाने देण्यात यावे, या मागणीसाठी किरकोळ फटाका विक्रेता असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.१०) महापौर नंदा जिचकार यांना निवेदन दिले.

यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, प्रतोद दिव्या धुरडे, माजी महापौर प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्दिकी, महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, उपायुक्त रवींद्र देवतळे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, किरकोळ फटाका विक्रेता असोसिएशनचे प्रतिनिधी विरेंद्र शाहू प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, फटाक्याचे दुकान हंगामी असते. आणि ते लागावे असे आम्हाला मनापासून वाटते. पर्यावरणाच्या दृष्टीने काही ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने कायद्याप्रमाणे जे योग्य असेल तोच निर्णय घेण्यात येईल. अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेऊ. काही बाबतीत आमचे हात बांधले असल्याने बुधवारी (११ ऑक्टोबर) पालकमंत्र्यांशी भेटून तातडीने हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ घेतली असून ११ ऑक्टोबर रोजी सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि माजी महापौर प्रवीण दटके हे स्वत: शिष्टमंडळासह पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत.