Published On : Mon, Jan 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सुरक्षेच्या दृष्टीने पूर्व नागपुरात अग्निशमन केंद्र महत्वाची भूमिका बजावणार : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

वाठोडा येथे अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन

नागपूर : नागपूर शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील विविध भागात अग्निशमन सुविधा असणे गरजेचे आहे. या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका शहरातील विविध भागात अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवत आहे. पूर्व नागपूर हे दाटीवाटीचे क्षेत्र आहे. या परिसरात आशिया खंडातील सर्वात मोठे लाकूड बाजार आहे, डम्पिंग यार्ड आहे तसेच फळ आणि भाज्यांचे बाजार यासोबतच अनेक उद्योग असल्यामुळे वाठोडा येथील हे अग्निशमन केंद्र सुरकक्षेच्या दृष्टीने पूर्व नागपुरात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. रविवारी (९) प्रभाग क्रमांक २६ येथील वाठोडा-सालासर विहार, आमला ट्री रोड येथे अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रसंगी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा धावडे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अग्निशमन समिती सभापती दीपक चौधरी, परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, प्रभाग क्र. २६ चे नगरसेवक तसेच कार्यक्रमाचे आयोजक ऍड. धर्मपाल मेश्राम, माजी उपमहापौर तथा नगरसेविका मनिषा कोठे, प्रभाग क्रमांक २६ च्या नगरसेविका समिता चकोले, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, प्रभारी कार्यकारी अभियंता नरेश सिंगनजूडे, सालासर विहार कॉलनीचे सारडा, सतीश शर्मा आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाले, नागपूर शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता राज्य सरकारकडून शहरासाठी १३ अग्निशमन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या शृंखलेत वाठोडा येथे १०व्या अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. सुरुवातीला लकडगंज येथे अग्निशमन केंद्र होते. मात्र पूर्व नागपुरातील लोकसंख्या आणि क्षेत्र वाढल्यामुळे या केंद्रावरील भार वाढला. त्यामुळे पूर्व नागपुरात आणखी एका अग्निशमन केंद्राची आवश्यकता होती. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रभाग २६ चे नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या अथक प्रयत्नाचे फलित आज वाठोडा येथे अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन पार पडले. यासाठी महापौरांनी कृष्णा खोपडे आणि नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांचे अभिनंदन केले. सदर अद्ययावत अग्निशमन केंद्र अडीच एकर जागेवर तयार होत असून यासाठी ५ कोटी रुपयाचा खर्च प्रस्तावित आहे. येथील इमारत सात माजली असून येथील कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्थासुद्धा येथे करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळ वाया न जाता तात्काळ सेवा देता येईल या उद्देशाने या केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. वाठोडा अग्निशमन केंद्र एक उत्तम सेवा देणारे केंद्र बनेल, असाही विश्वास यावेळी महापौरांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात नागपूर महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे जी अग्निशमन सेवा देण्यासोबतच अग्निशमन सेवेत काम करणारे कर्मचारी, अधिकारी तयार करते. नागपूर मनपाचे एक स्वतंत्र फायर फायटिंगचे कॉलेज आहे. ज्यामध्ये दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन अग्निशमन केंद्रात सेवा करणारे कर्मचारी/अधिकारी तयार केले जातात. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात मनपाचे अग्निशमन विभाग सिमीत सामुग्रीतही उत्तम कार्य करीत आहे. बदलत्या काळानुसार शहरात गगनचुंबी इमारती बनत आहेत. यादृष्टीने अग्निशमन केंद्रात आवश्यक साधने आणली जात आहेत, असेही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले. मनपाच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र वर्ष उलटूनही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही त्यामुळे या विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येत नाही आहे. त्यामुळे आपण स्वतः यात लक्ष घालून प्रस्तावाला मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी कृष्णा खोपडे यांना केली.

यावेळी उपस्थित मान्यवर आमदार कृष्णा खोपडे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आणि अग्निशमन विभागाचे सभापती दीपक चौधरी यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आणि ऍड. धर्मपाल मेश्राम यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम मानले.

Advertisement
Advertisement
Advertisement